- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जनतेने नेतृत्वाची संधी देणे हाच लोकप्रतिनिधींचा सर्वोच्च सन्मान : ना. नितीन गडकरी

नागपूर महानगरपालिकेतर्फे कर्तृत्ववानांचा हृद्य सत्कार सोहळा

नागपूर समाचार : मागील पाच वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात विविध विकासकामे केली. जनतेने त्यांचा प्रतिनिधी म्हणून टाकलेल्या विश्वासावर खरे उतरण्याचा प्रयत्न केला. जनतेने नेतृत्वाची संधी देणे हाच या लोकप्रतिनिधींचा सर्वोच्च सन्मान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे देशात आपल्या कार्यकर्तृत्वाने शहराचे नावलौकीक करणा-या कर्तृत्ववानांचा सत्कार शुक्रवारी (ता.४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाचा आज अखेरचा दिवस होता. यानिमित्ताने सर्वपक्षीय नगरसेवकांचाही सन्मान करण्यात आला. मनपा मुख्यालयातील प्रशासकीय इमारत परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते.

मंचावर उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, माजी महापौर नंदा जिचकार, माया इवनाते, नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका शिल्पा धोटे, नगरसेवक प्रमोद कौरती, नगरसेविका प्रगती पाटील, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, एकीकडे नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने जोमाने विकासकार्य सुरू आहेत. सार्वजनिक आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून देण्यावर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. याच मालेत आता नागपूर महानगरपालिकेची शहरबस वाहतूक मेट्रोकडे सोपवून नागपूरकरांचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. शहरातील साधनसुविधांचा विकास होत असताना नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागातील साधनसुविधा सुद्धा सशक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिक केंद्राचे मंत्री, खासदार, आमदार यांना विचारणार नाही पण नगरसेवक हा त्यांच्या हक्काचा माणूस असतो. नगरसेवकांचा संपर्क जनतेशी असलेली जवळीक यावर त्यांच्या कामाचे रिपोर्टकार्ड तयार होत असते. पाच वर्षापूर्वी जनतेनी दिलेल्या संधीचे आपण सर्वांनी सोने केले याबद्दल त्यांनी सर्व नगरसेवकांचे कौतुक केले. महानगरपालिकेने केलेल्या अनेक दखलपात्र कामांचे त्यांनी कौतुक केले. पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनाने मिळून विकासाच्या बाबतीत केलेले टिमवर्क अतुलनीय आहे. याची प्रचिती कोरोना काळात आल्याचे त्यांनी सांगतिले. कोरोना काळात प्रशासनाने केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख करीत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे कौतुक केले. अटलबिहारी वाजपेयी ई-लायब्ररी, वंदे मातरम् उद्यान, वंदे मातरम् जनस्वास्थ्य केंद्र, सुपर ७५ या आणि असे अनेक उपक्रम सत्यात उतरविल्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांचे विशेष कौतुक केले.

सत्कारमूर्तिंचाही त्यांनी गौरवोल्लेख करीत त्यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून दिली. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांचा त्यांनी ‘मेट्रो मॅन’ म्हणून उल्लेख केला. ज्येष्ठ विधिज्ञ व्ही.आर. मनोहर यांचे युक्तिवाद ऐकण्यासाठी आपण स्वत: न्यायालयात जात असल्याचा उल्लेख ना.गडकरी यांनी आवर्जून केला. सोलर इंडस्ट्रीजचे प्रबंध निदेशक सत्यनारायण नुवाल यांनी कठीण परिस्थितीतून केलेल्या मेहनतीच्या व प्रामाणिक प्रयत्नाच्या जोरावर नवे उद्योगविश्व निर्माण केले. गृहमंत्री राजनाथ सिंह, दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी त्यांच्या उद्योगाला भेट देउन त्यांच्या कार्याची स्तूती केली. सामाजिक दायित्वातही ते अग्रेसर असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी केला. बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड, राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता श्रीनभ अग्रवाल, बॉक्सिंग चॅम्पियन अल्फिया पठाण, ज्यूनिअर ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता, स्केटिंगपटू अद्वैत रेड्डी यांनीही त्यांच्या क्षेत्रात अव्‍वल स्थान पटकावून नागपूरची मान उंचावली.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी माजी महापौर नंदा जिचकार, संदीप जोशी व आतापर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कार्याचा लेखाजोखा मांडला. या संपूर्ण काळात शहरातील भौतिक विकासासोबतच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास आणि आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर दिला. यापूर्वीच्या महापौरांनी सुरू केलेल्या अनेक योजना, उपक्रम आपण पूर्णत्वास नेउ शकलो, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगतिले. या सर्व कामात प्रशासनाने केलेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मनपाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी शाळा, ई-लायब्ररी, ऑनलाईन शिक्षणाच्या दृष्टीने मनपा शाळांतील २ हजार विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि एनडीए प्रवेशाच्या तयारीच्या दृष्टीने ७५ विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेले विशेष प्रशिक्षण या शैक्षणिक क्षेत्रातल्या तर इंदिरा गांधी रुग्णालय, के.टी. नगर रुग्णालय, आयुष रुग्णालय, आयसोलेशन या रुग्णालयांचा विस्तार आणि ७५ वंदे मातरम् जनस्वास्थ केंद्राचे निर्माण व प्राथमिक आरोग्य केंद्रांची वाढलेली संख्या या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय उपलब्धी ठरल्या. ऑक्सिजन पार्क, वंदे मातरम् उद्यान, आरोग्य शिबिर, दंत चिकित्सा शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, पाचपावली सूतिकागृहात सिकलसेल अनुसंधान केंद्र, गर्भाशय कर्करोगाची मोफत तपासणी व निदान केंद्र, शहरात विविध ठिकाणी १३ पाण्याच्या टाक्या, देशातील पहिली डबल डेकर पाण्याची टाकी या महत्वाच्या बाबींचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यांनी मनपा आयुक्तांचे या कामात सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

उपमहापौर मनीषा धावडे यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी प्रास्ताविकात संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. आभार स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी मानले. यावेळी सर्व नगरसेवकांनी केन्द्रीय मंत्री, महापौर आणि आयुक्तांसोबत एकत्रित छायाचित्र काढून मनपातील नवीन परंपरेला सुरूवात केली.

कर्तृत्ववानांचा हृद्य सत्कार……

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरचे देशपातळीवर नाव उंच करणा-या कर्तृत्ववान व्यक्तींचा मनपाचा मानाचा दुपट्टा, स्मृतिचिन्ह, तुळशी रोपटे देउन यावेळी सत्कार करण्यात आला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, सोलर इंडस्ट्रीजचे प्रबंध निदेशक सत्यनारायण नुवाल, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड, राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता श्रीनभ अग्रवाल, बॉक्सिंग चॅम्पियन अल्फिया पठाण, ज्यूनिअर बुद्धिबळ ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता आणि स्केटिंगमधील सुवर्णपदक विजेता पाच वर्षीय अद्वैत रेड्डी यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. ज्येष्ठ विधिज्ञ व्ही.आर. मनोहर हे प्रकृती अस्वास्थामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांचा सत्कार निवासस्थानी जाउन करण्यात येईल, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले. सत्कारमूर्तिंच्या वतीने महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले.

नागपूर गौरव गीताचा सन्मान…..

नागपूर शहराची महती सांगणारे एक गीत असावे या महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून एक स्पर्धा घेण्यात आली. त्यामधून सर्वोत्कृष्ट गीताला ‘नागपूर गौरव गीत’ म्हणून जाहिर करण्यात आले. स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या शैलेश दाणी यांच्या गीताला ३१ हजार रुपये प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय पुरस्कार मोरेश्वर मेश्राम यांना २१ हजार रुपये, डॉ. राधा धात्रक यांना ११ हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार तर शैलजा नाईक व प्रतिभा जोहरापुरकर यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नागपूर शहराच्या गौरव गीताचे सादरीकरण झाले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी शहीदांना समर्पित दिनदर्शिकाचे सुध्दा विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाद्वारे दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनेंतर्गत अंध विद्यार्थिनी नाझमीन तब्बसुम शेख हिला ब्रेल लिपीतील लॅपटॉप खरेदीसाठी ६० हजार ५०० रुपयांचा धनादेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याच विद्यार्थिनीने ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गीत गाउन उपस्थितांना भावूक केले.

Leave a Reply

Your email address will not be published.