- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूर जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा केला दुप्पट; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सातत्याने गॅस कंपन्यांकडे पाठपुरावा

▪️उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी शेड आणि पिण्याच्या पाण्याची सक्ती

▪️डिजिटल वजनकाटा आणि गॅस गळती तपासणी (PDI) अनिवार्य; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कडक कारवाईचा इशारा 

नागपूर समाचार : जागतिक परिस्थिती आणि तांत्रिक कारणांमुळे नागपूर शहर व जिल्ह्यात निर्माण झालेली घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई दूर करण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने तत्पर उपाययोजना करून गॅस कंपन्या व व एजन्सी यामध्ये समन्वय साधत मागणी व पुरवठा यामधील दरी कमी करण्यात यश मिळविले. 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ८ एप्रिल पासून आयओसीएल , बीपीसीएल , एचपीसीएल ऑईल कंपन्यांच्या प्रादेशिक व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांसोबत सलग आढावा बैठका घेतल्या. या प्रशासकीय पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील गॅस वितरण व्यवस्था आता पूर्वपदावर येत आहे.

जिल्हा प्रशासनाने घेतलेले प्रमुख निर्णय व अंमलबजावणी

सिलेंडर पुरवठ्यात दुप्पट वाढ

ग्राहकांची वाढती मागणी आणि प्रलंबित बुकिंगचा बॅकलॉग संपवण्यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशांनूसार गॅस कंपन्यांनी नागपूरचा दैनंदिन पुरवठा दुप्पट केला आहे.

▪️एचपीसीएल कंपनीकडून यापूर्वी नागपूर शहरात ८,४५० सिलिंडरचा पुरवठा केला जात होता, तो आता १९,७०० करण्यात आला आहे.

 

▪️बीपीसीएल कंपनीकडून ९९ MT (सुमारे ६,९७२ सिलिंडर) चा दैनंदिन पुरवठा नियमित सुरू आहे.

▪️आयओसीएल कंपनीकडून मानकापूर येथील रश्मी गॅस एजन्सी व यासारख्या अन्य ठिकाणी प्रतीक्षा यादी मोठी होती तिथे तातडीने अतिरिक्त कोटा देऊन पुरवठा दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील ५ ते १० दिवसांत सर्व प्रलंबित वेटिंग क्लिअर होणार आहे.

स्थलांतरित कामगारांसाठी FTL सिलिंडर 

स्थलांतरित कामगारांसाठी उपयुक्त असलेल्या ५ किलोच्या FTL सिलिंडरच्या वितरण प्रमाणातही दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

‘फर्स्ट इन फर्स्ट आउट’ (FIFO) पद्धत आणि अतिरिक्त यंत्रणा 

गॅस वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी ‘ज्यांनी आधी बुकिंग केले, त्यांना आधी सिलिंडर’ या FIFO पद्धतीचा अवलंब करण्याच्या कडक सूचना सर्व एजन्सींना देण्यात आल्या आहेत. ज्या गॅस एजन्सींवर ग्राहकांच्या तक्रारी अधिक आहेत, तिथे घरपोच सेवा जलद करण्यासाठी अतिरिक्त वाहने आणि डिलिव्हरी बॉय तैनात करण्यात आले आहेत. 

ओटीपी अनिवार्य आणि सेतू केंद्रांवर मोफत ई-केवायसी

गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि बनावट डिलिव्हरी रोखण्यासाठी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (DAC/OTP) अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व एजन्सींना किमान ९० ते ९५ टक्के वितरण केवळ OTP द्वारेच करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या भागात मोबाईल नेटवर्क किंवा तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांना OTP मिळत नाही, तिथे डिलिव्हरी बॉयने अधिकृत ॲपद्वारे ग्राहकाची ओळख (KYC) पडताळून गॅस देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रांमध्ये मोफत ई-केवायसी करून देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. 

उष्णतेच्या दृष्टीने विविध ग्राहकांचे संरक्षण

नागपूर जिल्ह्यातील वाढता उन्हाळा आणि उष्णतेची लाट लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून सर्व गॅस एजन्सींना खालील सुविधा पुरवण्याचे कडक आदेश दिले. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

शेड व सावलीची सक्ती

वितरण केंद्रांवर भरउन्हात उभे राहणाऱ्या ग्राहकांचे उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी तातडीने शेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक केंद्रावर शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध

शिस्तबद्ध वितरण : केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी वेळेचे चोख नियोजन केले जात असून, तालुका स्तरावर निरीक्षण अधिकारी आणि नागपूर शहरात परिमंडळ अधिकाऱ्यांमार्फत याचे थेट संनियंत्रण (Monitoring) सुरू आहे.

सुरक्षा, वजन मानके आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन

जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने शहरातील विविध एजन्सींना प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी मोहीम तीव्र केली आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि आर्थिक हितासाठी खालील बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

वजनाची प्रात्यक्षिक तपासणी

प्रत्येक डिलिव्हरी बॉयकडे प्रमाणित ‘डिजिटल पोर्टेबल वजन काटा’ असणे बंधनकारक असून, ग्राहकासमोर वजन करून दाखवणे अनिवार्य आहे.

गळती तपासणी

डिलिव्हरी बॉयने ‘ओ-रिंग लीक डिटेक्टर’ आणि ‘व्हॉल्व्ह लीक टेस्टर’द्वारे गॅस गळती नसल्याची खात्री ग्राहकासमक्ष करणे अनिवार्य आहे.

दोषी सिलिंडर तात्काळ बदलणे

वजनात तफावत आढळल्यास किंवा गळती असल्यास सिलिंडर तात्काळ बदलून देणे वितरकास बंधनकारक राहील.

वाहतूक गाड्यांमध्ये सुधारणा

सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर एजन्सीचे नाव, संपर्क क्रमांक, ठरवून दिलेला रंग आणि अग्निशमन उपकरण असणे बंधनकारक आहे. तसेच डिलिव्हरी बॉयसाठी ड्रेसकोड आणि ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

प्रशासनाचा इशारा आणि आवाहन 

“घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा आता पूर्णपणे सुरळीत झाला असून साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे किंवा विनाकारण साठा करण्याचे कारण नाही. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे आणि आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या गॅस एजन्सींवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल.” असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.