- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आधार ठरला आशेचा किरण; मानसिकदृष्ट्या अस्वस्थ ज्योतीची अखेर पटली ओळख

नागपूर समाचार : आधार कार्ड काढतांना ज्या तांत्रीक बायोमॅट्रीक प्रणालीशी आपले ठसे जुळवतांना प्रत्येकाने दिलेली परीक्षा आपल्या ओळखीला प्रस्थापित करण्यासाठी किती अनमोल ठरु शकते याची प्रचिती विस्मृतीत गेलेल्या ज्योतीच्या माध्यमातून समोर आली आहे. अवघे सतरा वयवर्ष असलेली ज्योती अत्यंत भुकेल्या अवस्थेत खापरखेडा पोलीसांना पीडब्लुसीएन कॉलनीजवळ दोन वर्षांपूर्वी दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी आढळून आली होती. तिच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीमुळे घरचा पत्ता व ओळख ती हरवून बसली होती.

खापरखेडा पोलीसांनी मसाळा नागपूर येथील आशा किरण बालगृह केअर अँड सपोर्ट सेंटरमध्ये तिला सुरक्षीत सुपूर्द केले. 

एक अनामिक अवस्थेतील जीवन तिच्या वाट्याला आले. आशा सेंटरने तिच्या ओळखीसाठी आपल्या प्रयत्नांची शर्थ चालू ठेवली. 17 एप्रिल 2026 रोजी आधार अर्थात युआयडीएआय च्या संकेतस्थळावरील फाईंड आधार या बायोमेट्रीक सुविधेच्या मदतीने तिच्या अंगठ्याच्या ठशाची नोंदणी पडताळून घेण्यात आली. या ठशाची नोंद जुळली ती थेट उत्तर प्रदेशातील नोंदीशी. पुन्हा ही पडताळणी अधिकृत करुन घेण्यात आली.

आधार बायोमॅट्रीकच्या माध्यमातून पडताळणीचा पर्याय ज्योतीसाठी पुन्हा आपल्या कुटुंबापर्यंत, घरापर्यंत सुखरुप पोहचविण्यासाठी मोलाचा ठरला. आशा किरण बालगृहाच्या अधीक्षकांनी युआयडीएआय आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व यंत्रणांचे तिची ओळख पटवून दिल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

ओळख पटल्याने बालकल्याण समिती, स्थानिक पोलीस आणि कायदेशिर प्राधिकरणाच्या प्रयत्नांमुळे ज्योतीचा तिच्या कुटुंबाकडे सुरक्षीत परतण्याचा मार्ग आता मोकळा झाला.

आधारच्या मुंबईस्थित प्रादेशिक कार्यालयाने आपल्या आधारचा प्रभावी वापर, सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही किती लाख मोलाचा असू शकतो हे पटवून दिले. ही केवळ पडताळणी नव्हती तर आधारच्या सर्वसमावेशक व मानवतावादी दृष्टीकोनाला चालना देणारी मदतीची एक घटना ठरली आहे.