नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. महिला, पुरुष, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्या ना. श्री. गडकरी यांच्यापुढे मांडल्या. मंत्री महोदयांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. यावेळी तरुणांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात रविवारी सकाळपासून मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी ना. श्री. गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. विविध मागण्यांची निवेदने स्वीकारून मंत्री महोदयांनी संबंधित विभागांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या अडीअडचणी, समस्या आणि मागण्या थेट मंत्री महोदयांपुढे मांडल्या. विशेषतः दिव्यांग नागरिकांनी कृत्रिम अवयवांच्या उपलब्धतेसाठी निवेदन सादर केले. ना. श्री. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी काही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनीदेखील ना. श्री. गडकरी यांची भेट घेतली.
सरकारी योजनांमधून मदत मिळण्यासंदर्भात ज्येष्ठांनी निवेदने दिली. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार यासारख्या योजनांच्या संदर्भात ज्येष्ठांना सहकार्य करण्याचे निर्देश ना. श्री. गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तर दिव्यांग बांधवांनी सरकारी योजनांमधून सहकार्य मिळण्यासोबतच कृत्रिम अवयवांच्या मागणीसाठी ना. श्री. गडकरी यांना निवेदन दिले. त्यांच्या समस्यांवर फुंकर घालण्याचे काम जनसंपर्क कार्यक्रमातून झाले.
विविध संस्थांचे प्रतिनिधी आपल्या संस्थांच्या अडचणी घेऊन यावेळी आले होते. काहींनी निधी, जागा किंवा परवानग्यांसंबंधी समस्या मांडल्या. सामाजिक व धार्मिक संस्थांनी त्यांच्या समुदायातील प्रश्न तसेच उपक्रमांसाठी मदतीची विनंती करणारी निवेदने दिली. गडकरी यांनी सर्व नागरिकांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. नागपूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय, नासुप्र, आरोग्य विभागांमधील अधिकारी जनसंपर्क कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणे अधिक सोयीचे ठरले.
इनोव्हेटिव्ह कल्पनांचे प्रेझेंटेशन
इलेक्ट्रिक व्हेइकल्स, त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीज, राष्ट्रीय महामार्गांवरील मुलभूत सोयीसुविधा आदींच्या संदर्भात तरुणांनी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्यापुढे प्रेझेंटेशन दिले. ना. श्री. गडकरी यांनी या कल्पनांचे कौतुक करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.




