नागपूर समाचार : नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत “ऑपरेशन शक्ती” अंतर्गत 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पावणे पाच वाजल्यापासून रात्री सव्वादहा वाजेपर्यंत मोठी कारवाई करण्यात आली. हिंगणा रोडवरील ओयो अर्बन रिट्रीट येथे टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी देहव्यापार सुरू असल्याचे उघड केले.
कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली असून चार आरोपींपैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये जयश्री संतोष सोळंकी (वय 38, अमरावती), सलमान उर्फ रोशन राजेश डोंगरे (वय 36, नागपूर) आणि अक्षय रोशन रामटेके (वय 32, नागपूर) यांचा समावेश आहे, तर रजत राजेश डोंगरे हा फरार आहे. आरोपींनी महिलांना कमी वेळात अधिक पैसे मिळण्याचे प्रलोभन देऊन देहव्यापारास प्रवृत्त केले असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण 6 लाख 33 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात नगदी, मोबाईल फोन, DVR, रजिस्टर, कंडोम पाकिटे तसेच होंडा अॅमेझ कारचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.