जयदीप कवाडेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आग्रही मागणी
नागपुर समाचार : राज्यातील आगामी निवडणुका महायुतीच्या छत्राखाली लढविण्याची दिशा निश्चित असताना, नागपूर महानगरपालिका निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) ला सन्मानजनक जागा देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नागपूर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे बालेकिल्ले असून येथे रिपब्लिकन–आंबेडकरवादी मतदारांचा निर्णायक प्रभाव आहे. त्यामुळे मित्रपक्षांना योग्य प्रतिनिधित्व न दिल्यास महायुतीला राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते, असेही जयदीप कवाडे यांनी सांगितले आहे.
जयदीप कवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती व मित्रपक्ष एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जात आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) ही महायुतीतील मित्रपक्ष म्हणून आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिकपणे सोबत उभी राहिली आहे. मात्र जागावाटपाच्या प्रक्रियेत मित्रपक्षांना अपेक्षित व सन्मानजनक वाटा दिला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नागपूरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान असल्याने येथे रिपब्लिकन व आंबेडकरवादी समाजाचा राजकीय वाटा मोठा आहे आणि मनपा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेची किल्ली मिळवून देण्यासाठी पीरिपा सज्ज आहे, असेही जयदीप कवाडे यांनी स्पष्ट केले.
आगामी नागपूर महानगरपालिकेत एकूण ३८ प्रभागांतून १५१ नगरसेवक निवडून येणार आहेत. नागपूर शहरात अनुसूचित जातींचे ४ लाख ८० हजार ७५९ तर अनुसूचित जमातींचे १ लाख ८८ हजार ४४४ मतदार आहेत. यामध्ये अनुसूचित जातींसाठी ३०, अनुसूचित जमातींसाठी १२ आणि ओबीसींसाठी ४० जागा राखीव आहेत. उत्तर नागपूर तसेच दक्षिण व दक्षिण-पश्चिम नागपूर भागांत पीरिपाचा प्रभाव दाट असून, रिपब्लिकन–आंबेडकरवादी विचारांच्या प्रामाणिक मतदारांचा पक्षावर ठाम विश्वास आहे, असा दावा जयदीप कवाडे यांनी केला.
या पार्श्वभूमीवर नागपूरचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपात पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) साठी स्वतंत्र व सन्मानजनक जागा राखून ठेवाव्यात. हे केवळ राजकीय समन्वयाचे नव्हे, तर नागपूरच्या रिपब्लिकन–आंबेडकरवादी मतदारांच्या सन्मानाचे पाऊल ठरेल, असे मत जयदीप कवाडे व्यक्त केले.
मित्रपक्षांना योग्य न्याय दिल्याशिवाय महायुतीचा विस्तार आणि आंबेडकरवादी समाजाचा विश्वास टिकणार नाही, असे ठामपणे सांगत जयदीप कवाडे यांनी पीरिपासाठी जागा सोडण्याची मागणी ही केवळ राजकीय सौजन्य नसून नागपूरच्या रिपब्लिकन–आंबेडकरवादी मतदारांचा लोकशाही अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.




