- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : लहान मुलांकरिता सदर येथे मनपाच्या इंग्रजी शाळा सुरू शाळेला पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका आणि आकांक्षा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राय बहादूर गोवर्धनदास गोपीकिशन राजारामका (अग्रवाल) इंग्रजी माध्यमाची शाळा (आर बी.जी.जी.आर.(ए)) सदर येथील शाळेचे नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सोमवारी (ता.२) शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांसह विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून, ज्युनिअर व सिनीअर के.जी साठी अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे.

विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि उत्तम दर्जेदार शिक्षण इंग्रजी माध्यमातून या शाळेत मिळणार असून, नागरिकांनी आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी,. शाळेकरिता मनपाला जागा दान करणारे अग्रवाल कुटुंबातील श्री. कुंजबिहारी अग्रवाल आणि श्रीमती कुमकुम कुंजबिहारी अग्रवाल, माजी नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल, मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, नोडल अधिकारी श्री. विनय बगले, शाळा निरीक्षक श्री. प्रशांत टेम्भूर्णे, पीएमयूचे श्री. सुनील सोनवणे, शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा खंडागळे, आकांक्षा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सौरभ तनेजा, बोर्ड मेंबर श्री. समीर बेंद्रे, संचालक श्री. सोमसुर्व चॅटर्जी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, मनपाने आकांक्षा फाऊंडेशनच्या सहकार्याने नागपुरात एकूण सहा शाळा सुरू केल्या असून, आर बी.जी.जी.आर.(ए) ही इंग्रजी माध्यमाची सातवी शाळा आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी इतर शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यात कुठेही मागे राहू नयेत, तसेच त्यांना नि:शुल्क आणि शिक्षण इंग्रजी माध्यमातून त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने ही शाळा सुरू करण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षापासून ज्युनिअर के.जी. व सिनीअर के. जी. मध्ये प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. तसेच पुढीलवर्षी इतर वर्ग सुरू करण्याचा मनपाचा मानस आहे. ही नवीन शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्नित आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश करून घेण्याची ही उत्तम संधी असून, अधिकाधिक पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी सांगितले की, आर बी.जी.जी.आर.(ए)) या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास होईल व त्यांना उत्तम शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थांचा पाय मजबूत होऊन भविष्य त्यांना उत्तम शिक्षणाची संधी मिळेल. मनपा शाळेतील शिक्षक नव्या व कौशल्यपूर्ण पद्धतीने, गाणे /नाट्य यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकवितात. पालकांनी देखील मुलांना दररोज शाळेत पाठवावे, त्यांच्या शिक्षकणाकडे लक्ष द्यावे,असे अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे व पालकांचे अभिनंदन केले. या शाळेत अजूनही प्रवेश सुरु असल्याची माहिती दिली. तर या विषयी इतरांना पण माहिती देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या शाळेकरिता मनपाला जागा दान करणारे अग्रवाल कुटुंबाचे श्री कुंजबिहारी अग्रवाल यांनी ही शाळा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हे एक शैक्षणिक अभियान असून, याला पुढे नेणे हे मोठे काम असल्याचे श्री. अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल यांनी मनपाने शाळा सुरू केल्याबद्दल आभार मानले.

मुले जसे निरीक्षण करतात तसे वागतात. या शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण व वातावरण मुलांना मिळणार आहे, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, पालकांनी निश्चिंत होऊन आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी केले. शाळेच्या प्रवेश प्रसंगी पालक देखील उपस्थित होते. त्यांनी शाळा, शाळेतील सोयी-सुविधा पाहून तसेच शिक्षकवृंदाना भेटून आनंद व्यक्त केला. मुलांनी देखील आनंदाने पहिल्या दिवशी शिक्षकांशी मैत्री केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *