नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या अमृत वर्षाचे औचित्य साधून स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी महिन्याच्या पहिल्याच दिवशी मनपा व नागपूर स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने व घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या नेतृत्वात दहाही झोनच्या सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत सोमवारी (ता.१) मनपाच्या दहाही झोनमध्ये ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ उपक्रम राबविण्यात आला.
मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ्ता विभागामार्फत प्रत्येक झोनमध्ये स्वच्छता करण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये सोनेगाव तलाव, धरमपेठ झोनमधील प्रभाग क्रमांक १४ मधील वॉकर्स स्ट्रीट, सी.पी आणि बेरार स्कूल रोड, हनुमान नगर झोन मधील प्रभाग क्रमांक ३२ मधील आदिवासीनगर उदयनगर मेन रोड, धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक १७ मधील राजाबक्ष मैदान, नेहरूनगर झोन मधील प्रभाग क्रमांक २६ मधील स्वामी नारायण मंदिर मेन रोड, वाठोडा, गांधीबाग झोन मधील प्रभाग क्रमांक १८ मधील मेहंदी लॉन जवळ, सतरंजीपुरा झोन मधील प्रभाग क्रमांक २० मधील नाईक तलाव परिसर, लकडगंज झोन मधील प्रभाग क्रमांक २३ मधील सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छीविसा, आशीनगर झोन मधील प्रभाग ३ मधील प्रवेश नगर समता मैदान, मंगळवारी झोन मधील प्रभाग ११ मधील अनंत नगर बाजार रोड मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली.
यावेळी नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्या बरोबर पावसाळ्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय नागरिकांना हाताची स्वच्छता राखणे, घराची स्वच्छता राखणे, परिसर स्वच्छ ठेवणे, शौचालयाची स्वच्छता राखणे, नाल्या व सांडपाण्याची जागा स्वच्छ ठेवणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या संदर्भात जनजागृत करण्यात आले.