- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार, मनपा, स्वास्थ 

नागपूर समाचार : पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा ‘बुस्टर डोज’ नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा ‘बुस्टर डोज’ नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर समाचार, ता. १० : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या कोमार्बिड व्यक्तींना बुस्टर डोस देण्यास सोमवारी (ता. १०) प्रारंभ झाला. पाचपावली स्त्री रुग्णायालय येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थित झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपंकर भिवगडे यांनी स्वास्थ्य सेवक गटातून ‘बुस्टर डोज’ची लस घेतली. या वेळी स्वत: पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोव्हॅक्सिन लसीचा बुस्टर डोज घेऊन नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोरोना महामारीपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आता बुस्टर डोजची आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशाप्रमाणे पात्र नागरिकांनी बुस्टर डोज घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६० वर्षावरील नागरिकांची आणि आरोग्य सेवक तसेच फ्रंटलाईन वर्कर्स साठी बुस्टर डोजची घोषणा केली आहे. हा डोज नागरिकांना नि:शुल्क दिला जात आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यात यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या वेळी जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, राम जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आयुक्त अभिजीत बावीस्कर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते.

नागपूर महानगर पालिकेतर्फे ११९ स्थायी केंद्रात कोविशिल्ड आणि २९ स्थायी केंद्रात कोव्हॅक्सिनची लस देण्यात येत आहे. पाचपावली केंद्रावर सकाळपासून बुस्टर डोज देण्यासाठी ६० वर्षावरील नागरिकांची आणि आरोग्य सेवक तसेच फ्रंटलाईन वर्कर्सची रांग लागली होती. सगळ्या केंद्रांमध्ये या प्रकारची रांग दिसून येत होती. मनपातर्फे केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच ६० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येत आहे.

नागपूर महानगरपालिकेकडून बुस्टर डोस देण्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे फ्रंटलाईन कर्मचारी आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीचे डोस देण्यात येणार आहेत. वरील सर्व जण दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी पात्र असतील. अशा पात्र ६० वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड लसीचे ११९ स्थायी केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच या केंद्रात वय १८ वरील सर्व नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येईल. कोव्हॅक्सीनसाठी २८ स्थायी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. ज्यांनी कोव्हॅक्सीन लस घेतली आहे, अशा ६० वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोज देण्यात येईल. तसेच या लसीकरण केंद्रांवर १५ वर्षावरील नागरिकांनासुद्धा पहिला व दुसरा डोस देण्यात येईल.

ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध

फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने कोविन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असे मनपाच्या वतीने कळवण्यात आले आहे. सर्व नागरिकांचे शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होईल.

१५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना आवाहन

सध्या कोव्हिड नियमावलीमुळे शाळा १५ जानेवारी पर्यंत बंद करण्यात आल्या. त्यामुळे सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व १५ ते १७ वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांनी २८ कोव्हॅक्सीन लसीकरण केन्द्रांवर जाऊन लसीकरण करावे, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापनाने पूढाकार घेऊन आपल्या विद्यार्थ्यांकरीता आपल्या शाळेत लसीकरण व्हावे यासाठी त्यांनी महानगरपालिका आरोग्य विभागाशी संपर्क करावा व १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात-लवकर पूर्ण करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *