- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ, संत्रानगरी

नागपूर समाचार : अटलजींच्या जयंती दिनानिमित्त सुशासन निर्माण करण्याचा संकल्प करा : ना. गडकरी

अटलजींच्या जयंती दिनानिमित्त सुशासन निर्माण करण्याचा संकल्प करा

नागपूर समाचार : स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्याजवळ सर्वसमावेशकता, सहिष्णुता सहजता होती. कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनात प्रेमाची, आपुलकीची भावना होती. त्यांचा स्मृतिदिन हा आपण सुशासन दिवस म्हणून साजरा करीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व अन्यत्र पदाधिकारी व सदस्य असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त सुशासन निर्माण करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. विकास महात्मे, महापौर दयाशंकर तिवारी, आ. मोहन मते, आ. कृष्णा  खोपडे, माजी आ. प्रा. अनिल सोले, माजी आ. गिरीश व्यास, माजी आ. डॉ. मिलिंद माने, माजी महापौर अर्चना डेहनकर व अन्य उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना.गडकरी म्हणाले- हिंदी साहित्यावर अटलजींचे विशेष प्रेम होते. हिंदी साहित्याचे अटलजी गाढे अभ्यासक होते. असामान्य वक्तृत्वाचे धन असलेल्या अटलजींच्या शब्दात प्रचंड ताकद होती. तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात माणुसकी, विचारधारेबद्दल कटिबध्दता होती. राष्ट्रभक्ती, राष्ट्र विकास, सुशासन व विकास आणि अंत्योदय हा विचार अटलजींनी कार्यकर्त्यांमध्ये रुजवला. राष्ट्रवाद हा आमच्या विचारांचा आत्मा आहे. राष्ट्रासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. सुशासन याचा अर्थ सर्व कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.

प्रशासन हे पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त, गतीने निर्णय घेणारे व परिणामकारक असावे, असा सुशासनाचा अर्थ आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- महानगर पालिका अशी तयार करा की नगरसेवकांना आणि तक्रारी घेऊन नागरिकांना मनपा कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही.

व्हिडिओ कॉन्फरसच्या माध्यमातून संपर्क वाढवा व नागरिकांच्या तक्रारी सोडवा. यालाच सुशासन म्हणता येईल. तंत्रज्ञान आता बदलले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या रोजच्या कामातही नगरसेवकांनी केला पाहिजे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले. याच कार्यक्रमात आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा ना. गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *