- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जागतिक माजी विद्यार्थी संमेलनात ‘एलआयटी रत्‍न’ पुरस्‍कार वितरीत  

एलआयटीचे कार्य जागतिक दर्जाचे – डॉ. नितीन राऊत 

नागपूर समाचार, २५ डिसेंबर २०२१ : स्‍वर्गीय रावबहादूर डी. लक्ष्‍मीनारायण यांच्‍या आशीर्वादाने सुरू झालेली एलआयटी ही संथा रसायनशास्‍त्रातील शिक्षण देणारी जागतिक दर्जाची संस्‍था आहे. संस्‍थेच्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी जगभरात आपल्‍या कामगिरीने संस्‍थेचा गौरव आणखी वाढवला आहे, असे प्रतिपादन ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्‍ह्याचे पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.  

लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) च्‍या माजी विद्यार्थ्‍यांचे जागतिक संमेलन शनिवारी हॉटेल सॉलिटेअर येथे पार पडले. ‘वन ड्रीम, वन टीम’ या मध्‍यवर्ती संकल्‍पनेवर आधारित या संमेलनाच्‍या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. नितीन राऊत आभासी माध्‍यमातून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते तर सीडीईटी एक्सप्लोसिव्ह अध्यक्ष अशोक राठी,, मॉईलचे सी. डी अतुलकर, लिटाचे अध्‍यक्ष डॉ. अजय देशपांडे एलआयटी संचालक डॉ. राजू मानकर, लिटाचे उपाध्‍यक्ष माधव लाभे, सचिव अरुण लांजेवार, संयोजक उत्‍कर्ष खोपकर यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. 

डॉ. नितीन राऊत यांनी विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या संस्‍थेच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचे पुरस्‍कार प्राप्‍त झाल्‍याबद्दल अभिनंदन केले व संमेलनासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. 

लिटाचे अध्‍यक्ष अजय देशपांडे यांनी देशातील केमिकल इंजिनीयरींग अँड टेक्‍नॉलॉजीच्‍या क्षेत्रात एलआयटीचे महत्‍वपूर्ण योगदान असल्‍याचे सांगितले. एलआयटीच्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करीत संस्‍थेचे नाव इत‍िहासात कोरले असल्‍याचे ते म्‍हणाले. एलआयटीचे संचालक डॉ. राजू मानकर यांनी लिटाच्‍या स्‍थापनेत योगदान देणा-या सर्वांचा विशेष उल्‍लेख करीत त्‍यांच्‍या योगदानामुळेच लिटा मोठी झाली, असे उद्गार काढले. डॉ. राजू मानकर यांनी एलआयटीच्‍या कार्याची माहिती दिली. 

अशोक राठी यांनी एलआयटीने आधुनिक जगाच्‍या आव्‍हानाना समोरे जाण्‍यासाठी तयार राहिले पाहिजे, असे उद्गार काढले तर मॉईलचे सी. डी. अतुलकर यांनी मायनिंग ही इंजिनीयरींगची स्‍वतत्र शाखा असून रसायनशास्‍त्राची त्‍यात महत्‍वाची भूमिका राहिली आहे. एलआयटीचे विद्यार्थी या क्षेत्रातही योगदान देऊ शकतात, असे ते म्हणाले.  

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी लिटाच्‍या कार्याचा गौरवपूर्ण उल्‍लेख केला. भविष्‍यातही ही लिटा ही संस्‍था आपल्‍या कार्यकर्तृत्‍वाने संस्‍थेचे नावे मोठे करेल, असे ते म्हणाले. 

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी ‘लिटा संवाद’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्‍यात आले. लिटा युथ फोरमच्‍या संयोजक मिली जुनेजा यांनी फोरमच्‍या कार्याची व पदाधिका-यांची ओळख करून दिली. सचिन पळसोकर यांनी आयआयटी रत्‍न पुरस्‍कारामागची भूमिका विशद केली. उत्‍कर्ष खोपकर यांनी प्रास्‍ताविक केले तर सूत्रसंचालन अमलेश पुरोहित व सुगंधा गारवे यांनी केले. अजय देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले.

एलआयटी रत्‍न पुरस्‍कार विजेते : या कार्यक्रमात नऊ माजी विद्यार्थ्यांना ‘एलआयटी रत्न’ ने पुरस्‍काराने करणार सन्मानित करण्‍यात आले. यात कॉर्पोरेट लिडर डॉ. मधुकर गर्ग, उद्योजक डॉ. अजय रांका, शिक्षणतज्‍ज्ञ उल्‍हास वैरागकर, उद्योजक संतोष बोरगावकर, उद्योजक रमेश तराळे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, अभिनेत्री अंजली जोशी, उद्योजक प्रकाश राणे, पोलिस सहआयुक्‍त मुंबई मिलिंद भारंबे यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ‘एलआयटी रत्‍न’ पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आले. सोबतच अतिरिक्‍त आयकर आयुक्‍त औरंगाबाद विश्‍वास मुंडे यांना ‘युथ आयकॉन’ पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *