- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित

पहिल्या पसंतीची 362 मते मिळाली

नागपूर समाचार दि. 14 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना एकूण ५५४ मतापैकी पाहिल्या पसंतीचे 362 मते मिळाली. ५ मते अवैध ठरली. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे ही मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निरिक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी प्रक्रीया पूर्ण झाली.

नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात होते. १० डिसेंबरला जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. एकूण 560 मतदारांपैकी 554 म्हणजेच 98.92 टक्के मतदारांनी आपला मताधिकार बजावला होता.

बचत भवन येथे आज सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्राँग रूम उघडण्यात आली. मतपत्रिकांची सरमिसळ, गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार टेबलवर मतमोजणी करण्यात आली. यामध्ये 554 पैकी 549 मते वैध, तर 5 मते अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली. विजयासाठी एकूण वैध मतांपैकी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्याच फेरीत विजयासाठी निश्चित मते प्राप्त केल्याने श्री. बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी श्री. बावनकुळे यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *