- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा पुढाकार

दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा पुढाकार

नागपूर समाचार, ता. ३ : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात मनपाने दिव्यांगांच्या उत्थानासाठी पुढाकार घेऊन विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग खेळाडूसाठी तसेच दिव्यांगांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी निधी उपलब्ध करून दिला तसेच पात्र दिव्यांगांना मोटराइज्ड ट्रायसिकल सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.

समाजातील प्रत्येक घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ देतानाच महानगरपालिकेच्या माध्यमातूनही त्यांना लाभ मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महापौर दयाशंकर तिवारी यांचे कार्य सुरू आहे. शहरातील दिव्यांग/अस्थीव्यंग व्यक्तींना कृत्रिम अवयव लावण्यासाठीही नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेत पंडीत दीनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत कृत्रिम अवयव लावण्यासाठी मोहिम राबविली. शहरातील गरजू व वैद्यकीयदृष्ट्या ज्यांना कृत्रिम अवयव लावण्याची गरज आहे अशांना याचा लाभ देण्यात आला.

महानगरपालिकेतर्फे शहरातील इयत्ता सातवी ते बारावी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. यासाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांकडून आवेदन मागविण्यात आले आहेत. मनपा तर्फे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात दिव्यांगाकरीता ५४ मोटोराइज्ड बॅटरी ट्रायसिकल देण्यात आले.

दिव्यांग खेळाडूंसाठी गुरूगोविंदसिंग स्टेडियम

शहरातील दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी जागा मैदान उपलब्ध नसल्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महत्वाचा निर्णय महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतला होता. उत्तर नागपुरातील गुरूगोविंदसिंग स्टेडियम दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय या स्टेडियममध्ये विविध खेळांचा सराव करणा-या खेळाडूंसाठी आवश्यक साहित्यांची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक तथा राज्यातील एकमेव अर्जुन क्रीडा पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांचे नाव गुरुगोविंदसिंग स्टेडियममधील जीमला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतला आहे. तसेच राज्य, राष्ट्रीय, पॅरा ऑलिम्पिक, आशियाई, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना ७५ टक्के खर्च दिला जाणार आहे.

दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य

नागपूर शहरातील दिव्यांग खेळाडूंना आपली कामगिरी पार पाडताना येणारी आर्थिक अडचण लक्षात घेउन नागपूर महानगरपालिकेने २ दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य सुद्धा केले. विशेष म्हणजे, दिव्यांग खेळाडूंना सहकार्य करणारी नागपूर महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिव्यांगांसाठी विविध योजनांची घोषणा केली होती. त्यामध्ये दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहायता करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे प्रतिमा बोंडे आणि रोशनी रिंके या दोन्ही एकलव्य राज्य पुरस्कारप्राप्त खेळाडूंना बंगळुरू येथील पॅरावेटलिफ्टींग स्पर्धेसाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक सहायता करण्यात आली होती. मनपाच्या या सहकार्याचे चिज करीत प्रतिमा बोंडे यांनी सुवर्णपदक तर रोशनी रिंके यांनी कांस्य पदक पटकावून शहराचे नाव लौकीक केले.

दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनेंतर्गत

– कर्णबधीर दिव्यांगांना शस्त्रक्रियेकरिता अर्थसहाय्यासाठी २५ लक्ष रुपये

– दिव्यांगांना वैयक्तीक स्वयंरोजगाराकरिता दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य योजनेसाठी २०० लक्ष रुपये

– मतीमंद घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता योजनेकरिता ५० लक्ष रुपये

– दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षण अर्थसहाय्य योजनेकरिता ५० लक्ष रुपये

– दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य योजनेसाठी २०० लक्ष रुपये

– प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक ३ अंतर्गत नासुप्र, म्हाडा व मनपातर्फे बांधण्यात येत असलेल्या मनपा हद्दीतील बांधकामाकरिता सोडत पद्धतीने निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना शासन अनुदान २.५० लक्ष रुपये सह ५० हजार महानगरपालिकेकडून अर्थसहाय्य योजनेसाठी १०० लक्ष रुपये प्रस्तावित असून राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणा-या दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य योजनेकरिता १०० लक्ष रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. या योजनेतंर्गत एक दिव्यांग मुलीला अर्थसहाय करण्यात आले असून ९ दिव्यांगाना मदत करण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *