- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपुर महाराष्ट्र : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन

पुणे समाचार : महाराष्ट्रातील गडकिल्ले शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवज, मराठा साम्राज्याचा सखोल अभ्यास ज्यांनी केला ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी 5:07 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे पार्थिव सकाळी आठ ते दहा या वेळेत पर्वती पायथा येथील त्यांच्या वाड्यावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आपल्या रसाळ, लालित्यपूर्ण शैलीने शिवाजीमहाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शतकामध्ये पदार्पण केल्यानंतरच्या साडेतीन महिन्यांनी देहावसान झाले.

प्रचंड व्यासंग, उत्साहाचा धबधबा असल्याने भव्यदिव्य अन हिमालयाहून अधिक उंचीचे एकाहून एक सरस असे उपक्रम अखेरच्या महिन्यापऱ्यंत करणारी प्रेरणाज्योत विझल्याने सह्यगिरीतील गडेकोट अन दऱ्याखोऱ्या मुक्या झाल्या.

अखेरपर्यंत म्हणजे कोरोनाची महासाथ सुरू होईपर्यंत व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी 29 जुलैला शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने त्यांच्या झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी उत्साहाने दीड-दीड तास आपले मनोगत व्यक्त केले होते तसेच दसऱ्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमासही ते प्रमुख पाहुणे होते.

मात्र २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते.

त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली, त्यांना न्युमोनिया आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचे निधन झाल्याचे आज सकाळी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. पुरंदरे यांच्या मागे चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. त्यांच्या सर्वच परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक कमावला आहे. वनस्थळी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निर्मलाताई कार्यरत होत्या. माधुरी या ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि गायिका आहेत.

ज्येष्ठ चिरंजीव अमृत हे पुरंदरे प्रकाशनची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात तर लहान चिरंजीव प्रसाद यांनी नाट्य तसेच दुचाकींच्या क्रीडा प्रकारात काम केले आहे. समाजप्रिय बाबासाहेबांचा संपर्क अनेक क्षेत्रांशी असल्याने केवळ पुण्यातीलच नव्हे तर देशातील त्यांच्या हजारो जणांना धक्का बसला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा……

जाळत्या ठिणग्या, पुरंदर्‍यांची दौलत, दख्खनची दौलत, सावित्री, सिंहगड, राजगड शेलारखिंड, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, कलावंतिणीचा सज्जा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्‍यांचा सरकारवाडा, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्‍याचे मानकरी यासह राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची 2014 साली प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीही आहे. भाषांतरकार – हेमा हेर्लेकर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *