- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी व तपासणीसाठी विशेष मोहिमेचा लाभ घ्या

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आवाहन

नागपुर समाचार : नागपूर महानगर पालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता पात्र नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीपासून कोणीही नागरिक वंचित राहू नये यासाठी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाव्दारा घोषित करण्यात आला आहे. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम शनिवारी आणि रविवारी दि. १३ व १४ नोव्हेंबर तसेच २७ व २८ नोव्हेंबर ला राबविण्यात येणार आहे. या दिवशी सर्व मतदार केंद्रावर मतदार यादीत नाव तपासता व नोंद करता येईल, या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केला आहे.

१८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदार म्हणून नांव नोंदविण्याचा कायदेशीर अधिकार आहे. नागपूर शहरातील १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या सर्व मतदारांनी आपले नाव मतदारयादीत नोंदविणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची पहिली पायरी म्हणजे मतदार नोंदणी होय. म्हणूनच १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकांनी मतदार यादीत नाव नोदवून लोकशाही व्यवस्थेत सहभागी व्हावे. तसेच मतदार यादीत आधीच नाव समाविष्ट असलेल्या मतदारांना नावात, पत्त्यात किंवा इतर काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठीसुद्धा अर्ज करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

ऑनलाईन/ऑफलाईन नाव नोंदणी

National Voter Service Portal (www.nvsp.in)

https://voterportal.eci.gov.in/ किंवा

– Voter Helpline App (VHA) मोबाईल अँप

– किंवा संबंधित मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे ऑफलाईन नोंदणी करता येईल.

वंचित घटकांच्या नाव नोंदीसाठी विशेष प्रयत्न :: या विशेष कार्यक्रमातून वंचित घटकांच्या नाव नोंदीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बेघर किंवा पदपथावर राहणाऱ्या व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि तृतीयपंथी हे आवश्यक कागदपत्रांच्या कमतरतेमुळे मतदार यादीत नाव नोंदवू शकत नाही. अशांसाठी भारत निवडणूक आयोगाने कागदपत्रांची विशेष सवलत दिली आहे. अशा व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांचे मतदार यादीत नाव नोंदवावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

नाव नोंदणी करताना आवश्यक महत्वाची काही कागदपत्रे :: मतदार म्हणून नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकाने अर्ज क्रमांक ६ भरणे आवश्यक आहे. १. अर्जदार भारताचा नागरिक असावा २. स्वतःचे छायाचित्र (पासपोर्ट साईज फोटो) ३. इतर कोणत्याही मतदार यादीत नाव नाही याविषयीचे प्रतिज्ञापत्र, जे अर्ज क्रमांक ६ मध्ये अंतर्भूत असते. ४. वयाचा दाखला ५. निवासाचा पुरावा

दिव्यांग मतदारांसाठी :: भारतीय निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी खास PWD या अँपची सोय केलेली आहे. यावरून दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता येईल. तसेच त्यांनी आधी नोंदणी केली असेल, पण दिव्यंगत्व म्हणून नोंद केली नसेल तर अशा व्यक्तींनाही या अँपवरून त्यांचे दिव्यंगत्व चिन्हांकित करता येतो.

आगामी नागपूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदर पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत तयार होणारी मतदार यादी अतिशय महत्वाची असुन सर्व संबंधितांनी आपले नावाची व त्याचे सर्व तपशील अचुक असल्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे तसेच आपले कुटुंबातील एकत्र राहणा-या व्यक्तींची नोंद एकाच यादीभाग क्रमांकात/मतदान केंद्रावर असल्याची खात्रीही करुन घ्यावी जेणेकरुन मतदानाचेवेळी अडचण निर्माण होणार नाही. कोणी मय्यत व्यक्ती/अपात्र व्यक्तीची सदर मतदार यादीत नोंद असेल तर ती सुध्दा संबंधित मतदार यादी भागाचे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांचे निर्दशनास आणुन द्यावी जेणेकरुन सदर मतदार यादीत निर्दोष होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *