विधीमंडळातील उच्चस्तरीय बैठकीत चर्चा
नागपूर समाचार, दि. 18 : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सात डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी आज सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे.
नागपूर येथे विधानभवनातील मंत्रीपरिषद दालनात प्रधान सचिव श्री.भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर , नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांसह विविध संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र विधान परिषद सभापतींचे सचिव म. मु. काज, उपसचिव राजेश तारवी,अवर सचिव रविंद्र जगदाळे, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल महाजन, विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा व सचिव सुनील झोरे, विधान भवनाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, विधीमंडळाचे पध्दती विश्लेषक अजय सर्वणकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
मुंबई येथे पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत अनुषंगिक तयारीसाठी सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला. यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना श्री. भागवत यांनी आरोग्य विभागाला आज केली. कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठीची आवश्यक व्यवस्था परिसरात करण्यात यावी. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टंसिंग’ राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी अभ्यागतांना कामकाज बघण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.
तत्पूर्वी, विधिमंडळ परिसरात सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सर्वप्रथम चर्चा झाली. विधिमंडळ परिसरात नवीन इमारत कार्यान्वित झाली आहे. या इमारतीसाठी आवश्यक असणारी सुरक्षा व्यवस्था व अनुषंगिक उपाययोजना करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यासोबतच विधान भवन, विधान भवनाबाहेर परिसर, आमदार निवास, रविभवन, 160 खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार निवास या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतचे निर्देश देण्यात आले. आमदार निवासामध्ये महिला आमदारांसाठी एक मजला राखीव ठेवण्यात यावा व विशेष पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, असे निर्देशित करण्यात आले.
अधिवेशन काळात करण्यात आलेल्या वाहन व्यवस्थेबाबत तसेच पार्किंग व्यवस्थेबाबत सूचना करण्यात आल्या. दूरध्वनी व्यवस्था, वाहन व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा, अहोरात्र वैद्यकीय सुविधा, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दलाची उपलब्धता, विनाअडथळा इंटरनेट, वाय-फाय सुविधा, रेल्वे आरक्षण, खानपान व्यवस्था, अन्नपदार्थ व पेय यांची तपासणी तसेच उत्तम स्वच्छता या संदर्भातही सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा करण्यात आली.