- नागपुर समाचार

ताजबाग परिसराच्या अतिरिक्त कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा -पालकमंत्री

नागपूर : बाबा ताजुद्दीन यांच्या मुख्य दरबाराच्या बाहेरील वऱ्हांडा, दर्ग्याच्या बाहेरील भिंतीचे सौंदर्यीकरण यासह मुख्य दर्ग्याच्या बाहेरील प्लॅटफॉर्मवर मेन दर्ग्याच्या बाहेर लावण्यात आालेल्या इन्ले फ्लोअरिंग लावण्यासह मोठा ताजबाग परिसरातील अतिरिक्त कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ताजबाग विकास आराखडा संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला समितीचे सदस्य आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., उपायुक्त विशेष शाखा बसवराज तेली, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, मुख्य अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख, उपायुक्त (नियोजन) धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी ‍मिलिंद नारिंगे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला ताजबाग संनियंत्रण समिती सदस्य म्हणून आमदार मोहन मते यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सद्य:स्थितीत ताजबाग विकास आराखड्यासाठी टप्पा-1 व टप्पा-2 साठी एकूण 132.49 कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विविध विकास कामाच्या कंत्राटात वृद्धिदरापोटी 10 टक्के तरतूद करण्यात आली आहे. त्यातील 5 कोटी 77 लक्ष निधीची बचत झाली आहे.

हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टद्वारे ताजबाग परिसरात भाविकांच्या सोयीसाठी बाबा ताजुद्दीन यांच्या मुख्य दरबाराच्या बाहेरील व्हऱ्हांडा, दरग्याच्या बाहेरील भिंतीचे सौंदर्यीकरण यासह मुख्य दर्ग्याच्या बाहेरील प्लॅटफॉर्मवर मेन दर्ग्याच्या व्हरांड्याबाहेर लावण्यात आालेल्या इन्ले फ्लोअरिंग प्रमाणे फ्लोअरिंग लावण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण परिसरात कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे, काही जागेवर शॉपिंग कॉम्लेक्सचे बांधकाम करणे, दुधिया कुआला आतल्या बाजूने टाईल्स लावणे, उर्स मैदानात वॉकिंग ट्रॅक बनविण्याची काम करण्याची विनंती ट्रस्टने केली आहे. याबाबत नवीन प्रस्तावित कामांवर निधी प्राप्त झाल्यानंतर काम करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या परिसरात यात्री निवास म्हणून सराय इमारतीचे बांधकाम सुरु आहे.

या इमारतीत अग्निशमन यंत्रणेच्या कामासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावाचे सादरीकरण संनियंत्रण समितीसमोर करण्यात आले. यावेळी सराय इमारतीचे काम उत्कृष्ट केल्याबाबत श्री. राऊत यांनी समाधान व्यक्त केले. सध्या सुरु असलेली कामे उपलब्ध निधीत करुन पुढील प्रस्तावित कामे अतिरिक्त निधी प्राप्त झाल्यावर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी दिली.

या परिसरातील विजेची व्यवस्था करण्यासाठी दुकानांना वेगवेगळे मीटर देण्यात यावे. तसेच सौर ऊर्जेच्या पॅनलची उभारणी करण्याची सूचना त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *