- नागपुर समाचार, मनपा

जिजाऊ स्मृती शोध संस्थान प्रकल्प देशातील महिलांसाठी ठरणार दिशादर्शक : महापौर दयाशंकर तिवारी प्रकल्पाचे डीपीआर प्रस्तावित करण्यासंदर्भात बैठक संपन्न 

नागपूर,ता.१९ : महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने नागपूर शहरामध्ये जिजाऊ स्मृती शोध संस्थान या महिला उद्योजकांना बळकटी देणा-या प्रकल्पाचे काम सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुमारे २३ कोटी निधीमधून साकारत असलेला हा प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प असून देशातील संपूर्ण महिलांसाठी तो दिशादर्शक ठरणार आहे, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

            नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहार्याने शंकर नगर येथे साकारत असलेल्या जिजाऊ स्मृती शोध संस्थान प्रकल्पांतर्गत महिला उद्योजकांकरिता ‘एक्सिबिशन कम इन्क्यूबेशन सेंटर’च्या डीपीआर प्रस्तावासंदर्भात रविवारी (ता.१९) विशेष बैठक पार पडली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी बोलत होते.

            मंचावर उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., माजी महापौर तथा प्रकल्पाच्या संयोजिका नंदा जिचकार, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाचे संचालक पी.एन.पार्लेवार, ज्येष्ठ नगरसेवक तथा नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा आदी उपस्थित होते.

            पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, आज महिला कुठेच कमी नाहीत. देशाचे, जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आधीच सक्षम असलेल्या या महिलांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे. ही बाब हेरून नंदा जिचकार यांनी त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात जिजाऊंच्या नावाने महिलांच्या उद्योजकतेसंदर्भात संशोधन प्रकल्प उभारण्याची संकल्पना मांडली. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाची सुत्रे आली. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला त्यांच्या मंत्रालयामार्फत निधी देण्याची व्यवस्था केली. महिलांच्या दृष्टीने सर्वसमावेश हा प्रकल्प व्हावा ही अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यादृष्टीने या प्रकल्पासंदर्भात कार्य होत आहेत. या प्रकल्पातून प्रशिक्षण घेउन, उद्योजकतेचे धडे घेउन बाहेर घेणा-या महिला या इतरांसाठी प्रेरणास्त्रोतच ठरणार आहेत, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेचे धडे दिले जातील मात्र त्यांनी आपल्या उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाची विक्री सुद्धा याच केंद्रातून व्हावी, अशी सूचनाही त्यांनी केली. याशिवाय विदर्भातील नागरिकांच्या दृष्टीने जिजाऊ स्मृती शोध संस्थान केंद्रामध्ये ‘क्लस्टर’ विसकसित करून त्यांच्याकरिता बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

 

…तर मिळणार पुढील पिढींना उद्योगाचे धडे : माजी महापौर नंदा जिचकार

            आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. शिक्षणात मुली अग्रेसर आहेत. मात्र त्यातुलनेत उद्योगामध्ये महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. महिला या कणखर आणि धैर्यवान असतात एखादे कार्य हाती घेतले की ते पूर्णत्वास नेण्याची त्यांच्यात जिद्द आहे. आजच्या काळात नोक-यांमध्ये अस्थैर्य निर्माण होत असताना महिलांनी उद्योजकतेच्या दृष्टीने पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्याच्या आदर्श राजाला घडविण्याचे महत्वाचे कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले. त्यांच्या नावाने नागपूर शहरामध्ये महिलांसाठी साकारत असलेल्या ‘जिजाऊ स्मृती शोध संस्थान’ महिलांना त्यांची पुढील पिढी सक्षम करण्यास प्रेरणा देईल. एक महिला उद्योजन झाल्यास तिच्या घरातील येणा-या पिढ्यांनाही उद्योजकतेचे धडे मिळून संपूर्ण परिवार व पिढी सक्षम होउ शकेल, असे प्रतिपादन माजी महापौर तथा प्रकल्पाच्या संयोजक नंदा जिचकार यांनी यावेळी केले. सदर प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ या प्रकल्पाच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्याच पुढाकाराने आज प्रकल्पाचे बांधकाम गतीशीलतेने पूर्णत्वाकडे जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘इन्क्यूबेशन’मुळे वाढणार उद्योजकांची संख्या : पी.एन.पार्लेवार

            आज भारतात जगाच्या तुलनेत महिला उद्योजकांचे प्रमाण केवळ १० टक्के एवढे आहे. त्यादृष्टीने जिजाऊ स्मृती शोध संस्थान हा प्रकल्प एक मोठी सुरूवात आहे. नागपुरात साकारत असलेला हा प्रकल्प देशातील महिलांसाठीचा ‘मॉडेल प्रोजेक्ट’ ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रदर्शनीकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच येथे ‘इन्क्यूबेशन’ प्रस्तावित आहे. ‘इन्क्यूबेशन’ ला उद्योजकांची नर्सरी म्हटले जाते. यामुळे महिला, पुरूष या सर्वांना उद्योजकतेच्या प्राथमिक धड्यापासून सर्व माहिती मिळू शकेल. त्यांचे कौशल्य विकसीत करण्यात येईल. सदर प्रकल्पामध्ये ‘इन्क्यूबेशन’ प्रस्तावित असून यासंदर्भात जागेसाठी मनपा प्रशासनासोबत चर्चा करण्यात येणार आहे. ‘इन्क्यूबेशन’मुळे या प्रकल्पाला मोठे स्वरूप प्राप्त होउन उद्योजकांची संख्याही वाढेल, असा विश्वास केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाचे संचालक पी.एन.पार्लेवार यांनी व्यक्त केला.

            केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे महिला उद्योगासंदर्भात अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांचा थेट लाभ महिलांना व्हावा व योग्य अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने ‘जिजाऊ स्मृती शोध संस्थान’च्या इमारतीमध्येच केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाचे कार्यालय राहणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

            याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, निगम सचिव डॉ.रंजना लाडे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर, आर्कीटेक्ट सातपुते आदी उपस्थित होते.

संचालन माधुरी इंदुरकर यांनी केले. आभार केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहायक संचालक प्रफुल्ल उमारे यांनी मानले.

असे असेल केंद्र

            ‘जिजाऊ स्मृती शोध संस्थान’च्या इमारतीचे बांधकाम शंकरनगर येथील ४०५१.७० वर्ग मीटर भूखंडातील ३१४०.७१ वर्ग मीटर जागेमध्ये प्रस्तावित आहे. हे केंद्र एकूण पाच माळ्याचे राहणार आहे. बेसमेंटमध्ये ३७ चारचाकी, १०७ दुचाकी, ११२ सायकल पार्कींगची क्षमता असून इतर मोकळी जागा सुद्धा राहणार आहे. तळमजल्यावर ९३१ वर्ग मीटर जागेमध्ये मोकळे प्रदर्शन भाग राहणार आहे. दुस-या माळ्यावर प्रदर्शन सभागृह, ई-लायब्ररीची व्यवस्था असून हे सर्व ७८९.७६ वर्ग मीटर जागेत असेल. तिस-या माळ्यावर कार्यशाळा, प्रशिक्षण सभागृह आणि कार्यालय असेल (८७२.६९६वर्ग मीटर). चवथ्या माळ्यावर २०० लोकांच्या क्षमतेचे सभागृह व छोटे कॉन्फरन्स हॉल (८८८.८४वर्ग मीटर) असेल. पाचव्या माळ्यावर २१२ वर्ग मीटर जागेमध्ये सभागृह आणि कॅफेटेरिया असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.