
आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेल्या दौराप्रसंगी ही बाब उघडकीस
नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी वाठोडा प्रभागातील भांडेवाडी डंपिंग यार्डला लागून असलेल्या तुलसीनगर, अंतूजीनगर, अब्बुमियानगर या भागातील दौरा केला. दौ-याचे प्रसंगी डंपिंग यार्डचे भिंतीला लागून असलेला नाला चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली. या नाल्यावर भूखंड माफियांनी मलमा टाकून व प्लाट काढून त्याची विक्री केली. अनेकांनी स्वस्त दरात हे भूखंड विकतही घेतले व त्यावर घराचे बांधकाम देखील केले असल्याचे या दौराप्रसंगी लक्षात आले. याबाबत आमदार कृष्णा खोपडे यांनी अधिका-यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले. परंतु आजपर्यंत कसलीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या अधिका-यांवर भूखंडमाफियांकडून दबाव असल्याची शंका निर्माण होते.
आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, काही दिवसापूर्वी माझे कार्यालयात या भागातील नागरिक आले व त्यांनी रस्त्यावर पाणी वाहत असल्याची तक्रार केली. त्या अनुषंगाने मी स्वत: स्थानीय नगरसेवक व नेहरूनगर झोनच्या अधिका-यासमवेत या भागाची पाहणी करण्यास गेलो असता या ठिकाणी भांडेवाडी डंपिंग यार्डच्या भिंतीला लागून असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात घराचे बांधकाम झाल्याचे लक्षात आले, त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत होते.
या घरमालकांना विचारणा केली असता काकडे नावाच्या व्यक्तीचे हे ले आउट आहे. त्यांनी या नाल्यावरच प्लाट टाकून प्रल्हाद कुर्वे नावाच्या दलालाच्या माध्यमातून या अवैध भूखंडाची विक्री केल्याचे लोकांनी सांगितले. अधिका-यांना तातडीने कारवाईचे निर्देश तर दिलेच आहे, परंतु या भूखंडमाफियावर देखील गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. मात्र हे भूखंडमाफिया नागरिकांवर दबाव आणत असल्यामुळे कुणीही तक्रार करण्यास सामोरे येत नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांचेसह नगरसेवक बंटी कुकडे, मनिषा कोठे, समिता चकोले, मनोज चापले, देवेंद्र मेहर, नेहरूनगर झोनचे सहारे, अशोक देशमुख, कपिल लेंडे, राजू दिवटे, अनिल कोडापे, सुनिल सूर्यवंशी, अनिकेत ठाकरे, व अनेक नागरिक उपस्थित होते.