- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : वाघाचा संशयास्पद मृत्यू

शरीराचे अवयव आहेत बेपत्ता : नागलवाडी रेंज वरपनी बीटमधील घटना

नागपूर समाचार : 23 मार्च, चनागपूर जिल्ह्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. तीन दिवसापुर्वी टी १ वाघीणीच्या दुसऱ्या शावकाचा मृत्यू उमरेड-कऱ्हांडला – पवनी अभयारण्यात झाला होता. आता यानंतर लगेचच पेंच व्याघ्र प्रकल्पातंर्गत नागलवाडी रेंज, वरपनी बीट मध्ये एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह आढळल्याने वनक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

एफडीसीएम अंतर्गत येणाऱ्या वरपनी बिट, रिसाळा रेंज परिसरात वनरक्षक शृंगाळपुतळे यांना गस्तीदरम्यान मृत अवस्थेत एका वाघाचा मृतदेह दुपारी दोन वाजताच्या सुमारास आढळला. सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याना देण्यात आली. अवघ्या काही वेळात वनविभागाची संपूर्ण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान सदर परिस्थितीचा आढावा घेतला असता या वाघाचे शरीर कुजलेल्या स्थितीत दिसून आले. तसेच या प्राण्याचे संपूर्ण केस गळून पडले होते. सर्वांत महत्वाचे म्हणजे या वाघाचे चारही पंजे कापलेले होते. पूर्ण वाढ झालेला वाघ हा किमान सात ते आठ दिवसांपुर्वीच मृत झाला असल्याचा अंदाज वनविभागाच्या वतीने लावण्यात आला. एनटीसीएच्या दिशानिर्देशानुसार या वाघाचे शवविच्छेदन २४ मार्चला करण्यात येणार असून त्यानंतरच या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळणार आहे. मात्र घटनेची संपुर्ण पाश्र्वभुमी लक्षात घेता शिकारीचा शक्यताही नाकारता येत नसल्याचे दिसून येते.

चार दिवसात चार वाघांच्या मृत्यू : विदर्भात मागील काही वर्षापासून वाघांच्या वाढत्या संख्येची नोंद झाली. वाघांची वाढती संख्या जरी आनंदाची बाब असली तरी त्यांच्यासाठी अधिवासाचे क्षेत्र हे कमी पडत असल्याची ओरड वन्यजीवप्रेमींकडून वारंवार होते. त्याचाच परिणाम वाघांचा मृत्यूच्या घटना वारंवार होत असल्याचे दिसून येते. शनिवारी उमरेड-कऱ्हांडला – पवनी अभयारण्यात टी १ नामक वाघीणीच्या दुसऱ्या शावक मृत्यूची घटना उघडकीस आली. तर एका दिवसाच्या फरकाने जागतिक वन दिवशी सेलू तालुक्यातील केळझर येथे वाघाचा मृत्यू त्यानंतर दोन दिवसाच्या फरकाने म्हणजेच २३ मार्च रोजी पांढरकवडा तालुक्यातील घोन्सा परिसरात आणि नागलवाडी परिसरातील वाघाचा मृत्यू झाल्याने मागील चार दिवसात चार वाघांच्या मृत्यूने विदर्भातील वनविभाग चांगलेच हादरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *