
मुंबई : राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी स्पोर्टस् सायन्स, स्पोर्टस् टेक्नॉलॉजी व स्पोर्टस् कोचिंग व ट्रेनिंग हे तीन अभ्यासक्रम सुरू होतील. नवे विद्यापीठ निर्मिती व इतर प्रशासकीय बाबींसाठी एकूण ४00 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात २00 कोटी अनावर्ती खचार्साठी, तर २00 कोटी कॉर्पस् फंड असेल. राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयकाला मंगळवारी विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली.
राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली क्रीडा विज्ञान, क्रीडा व्यवस्थापन आदीसह विविध क्षेत्रांत मोठ्या संधी आहेत. सोबतच क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुणवर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्यात जास्तीत जास्त दजेर्दार कोच/प्रशिक्षक तसेच खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे.