- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ, संत्रानगरी, हटके ख़बरे

नागपूर : गृहमंत्री वधुपिता तर जिल्हाधिकारी वरपिता, रविवारी लग्नसोहळा

नागपूर : मतिमंद व मूकबधिर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच त्यांच्या पुनर्वसनासाठी नि:स्पृहपणे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापळकर यांची मानस कन्या वर्षा व अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह रविवार, २० डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. या विवाहात वर्षाचे कन्यादान वधुपिता म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख व आरती देशमुख करणार असून, मूकबधिर समीरच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व ज्योत्स्ना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. रवींद्र ठाकरे व ज्योत्स्ना ठाकरे यांनी आज समीर व वर्षा या दोघांचे औक्षण करून, लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी रिद्धी देशमुख यांनी उभयतांचे स्वागत केले.

अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथे स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधीर अनाथालय आहे. २३ वर्षांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावर पोलिसांना बेवारस अवस्थेत सापडलेल्या मुलीला येथे आणण्यात आले. शंकरबाबांनी संगोपन करून चिमुकलीचा तिच्या आई-वडिलांप्रमाणे सांभाळ केला व तिला स्वतःचे नाव दिले. सहा वर्षांची झाल्यानंतर तिला संत गाडगेबाबा निवासी मूकबधिर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले. त्याचप्रमाणे डोंबिवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षांच्या समीरचासुद्धा वझ्झर येथील अनाथालयात शंकरबाबा पापळकरांनी स्वतःचे नाव देवून सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी त्याला नोकरी मिळवून दिली. बालगृहातील वर्षासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शंकरबाबांनी स्वतंत्र घर तसेच पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीनेसुद्धा त्याला स्वावलंबी केले. त्यानंतरच दोघांच्या विवाहाला समंती दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. अनाथालयात वाढलेल्या समीर व वर्षा यांचा विवाह २० डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. सामाजिक दायित्व म्हणून रवींद्र ठाकरे यांनी वरपित्याची जबाबदारी स्वीकारली. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कायम प्रयत्नशील असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या छत्रछायेत वाढलेल्या वर्षा आणि समीरचा विवाह सोहळा एक राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा व्हावा, तसेच दिव्यांगांच्या पुनर्वसनाबद्दल सामाजिक बांधिलकी वृद्धींगत व्हावी, असे मनोगत रवींद्र ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.