- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार

नागपुर : कोरोनावरील लस वितरणाच्या दृष्टीने सूक्ष्मनियोजन करा : मनपा आयुक्त राधाकृष्णन बि.

मनपामध्ये उपलब्ध डाटा बेसचा आधारे लसचे वितरण केल्या जाणार

नागपूर : कोव्हिड काळात अनेक अडचणींना सामोरे जात आरोग्य यंत्रणेने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आज परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र आता लवकरच कोरोनाची लस येऊ घातली आहे. ही लस आल्यानंतर ती वितरीत करण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. ही लस वितरीत करणे, आता आरोग्य यंत्रणेपुढील मोठे आव्हान राहणार आहे. त्यादृष्टीने तयार राहण्याचे आणि सूक्ष्मनियोजन करण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. त्यांनी खाजगी रुग्णालयांना, डॉक्टरांना त्यांच्याकडे कार्यरत आरोग्य सेवकांची माहिती लवकरात-लवकर मनपाला सादर करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की मनपामध्ये उपलब्ध डाटा बेसचा आधारे लसचे वितरण केल्या जाणार आहे.

महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी (ता. ९) आयोजित एका कार्यशाळेला ते संबोधित करीत होते. यावेळी कार्यकारी महापौर मनीषा कोठे, आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. संजय चिलकर, सर्व्हेलन्स ऑफिसर, डॉ. साजीद खान, नोडल अधिकारी डॉ. श्रीमती वैशाली मोहकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार उपस्थित होते.

पुढे बोलताना आयुक्त म्हणाले की, कोरोना काळात संपूर्ण भिस्त ही आरोग्य यंत्रणेवर होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडे नागरिक आश्वासक नजरेने बघतो. कोव्हिड काळात आरोग्य यंत्रणेने केलेले कार्य खरंच कौतुकास पात्र आहे. यामुळे नागरिकांचा मनपाच्या आरोग्य यंत्रणेवरील विश्वास वाढला. नागरिकांचा विश्वास वाढल्यामुळे यंत्रणेची जबाबदारीही वाढली आहे. कोरोनाच्या दरम्यान कितीही कठीण काळ आला तरी मनपाच्या आरोग्य यंत्रणेने धीराने त्याला तोंड दिले. आता परिस्थिती आटोक्यात असली तरी कोरोनावरील लस आता येऊ घातली आहे.

केंद्र सरकार ती कधीही सार्वजनिक रूपात उपलब्ध करेल. ही लस महाग असल्याने आणि सुरुवातील पुरवठा कमी होणार असल्याने केंद्र स्तरावर त्याची प्राथमिकता निश्चित करण्यात येत आहे. ही प्राथमिकता निश्चित होत असताना त्यादृष्टीने आपल्या शहरातील डेटा बेस तयार करणे, महत्त्वाचे आहे. शासकीय रुग्णालयांसोबत खासगी रुग्णालये, डॉक्टरांची यादी, ज्यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे, अशा रुग्णांची यादी तयार करण्याचे कामे आता आरोग्य यंत्रणेकडे आहे. लसीचा साठा करण्यासाठी आवश्यक असलेले कोल्ड स्टोरेज हे सुद्धा मोठे आव्हान आहे. यासाठी सूक्ष्मनियोजन करणे गरजेचे आहे.

नागपुरात दोन मोठे मेडिकल कॉलेज, एम्ससारखी संस्था असली तरी दुर्दैवाने महापालिकेकडे असे मोठे मेडिकल कॉलेज नाही. परंतु त्यातही सहा रुग्णालयांचा कायापालट करून प्राणवायू असलेल्या बेडस्‌ची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत जरी आपल्याकडे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नसले तरी आहे त्या व्यवस्थेत संपूर्ण सेवा अखेरच्या व्यक्तींपर्यंत पोहचविण्यासाठी ‘फूट सोल्जर’ तयार करणे, हे सुद्धा सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांपुढे आव्हान आहे. हे संपूर्ण नियोजन तातडीने करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोव्हिड काळात आरोग्याच्या दृष्टीने असलेल्या अनेक राष्ट्रीय कार्यक्रम राबवू शकलो नाही. त्या कार्यक्रमांसाठी निधी आलेला आहे. पुढील तीन महिन्यात या कार्यक्रमांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *