- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

चंद्रपूर : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यातील काँग्रेसचा पाठिंबा : विजय वडेट्टीवार

हाइलाइट्स 

  • शेतकऱ्यांच्या न्याय-हक्काच्या लढाईत काँग्रेस नेहमीच सोबत
  • शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनास हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

चंद्रपूर/गडचिरोली : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घाईघाईने कोणाशीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हे कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पाठींबा दिलेला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंम्बर ला देशव्यापी बंदचे आयोजन केले असून आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामील होऊन या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी बंदला पाठिंबा देतील अशी माहिती विजय वडेट्टीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विधानभवनातील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ‘केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहे’, असा ठराव मांडण्यात येऊन तो मंजूर करण्यात आला आहे.

शेतकऱ्याच्या देशव्यापी आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून काँग्रेस पक्ष सातत्याने हे अन्यायी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आला आहे. या लढाईत पहिल्या दिवसापासून काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षाची मशाल हाती घेतली आहे. भांडवलदारांच्या दावणीला शेतकऱ्याला बांधण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र असून शेतकऱ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याने येत्या ८ डिसेंम्बरला शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या आंदोलनास चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठींबा देऊन बंद यशस्वी करावे असे आव्हान राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *