मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभा
नागपूर समाचार : लोकनेते दत्ता मेघे यांनी अतिशय कष्टातून स्वतःचे जीवन उभे केले आणि हजारोंच्या जीवनाचा आधार झाले. राजकारणात असतानाही त्यांनी पूर्णवेळ समाजकारण केले. अशी माणसं दुर्मिळ असतात आणि दत्ताभाऊ राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्व होते, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी स्व. दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
व्हीसीए जामठा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. तर महापौर नीता ठाकरे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, राज्यसभा सदस्य माया ईवनाते, आमदार संजय कुटे, आमदार नाना पटोले, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचीही उपस्थिती होती. स्व. दत्ता मेघे यांचे सुपूत्र आमदार समीर मेघे, सागर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबियांची उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला दत्ताभाऊंनी जे दुःख सोसले, त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत समाजातील गोरगरिबांबद्दल त्यांच्यातील संवेदनशीलता जागृत होती. अडचणीत असलेली व्यक्ती त्यांच्याकडे आली तर ती कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे. प्रत्येकाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.’
स्व. दत्ता मेघे यांची एक आठवणही ना. श्री. गडकरी यांनी सांगितली. ‘मेडिकल चौकात एक भाजी विक्रेते दाम्पत्य होते. त्यांचा मुलगा बच्छराजमधून बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. पण निकालाच्याच दिवशी त्याची प्रकृती खराब झाली. मी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना फोन करून काळजी घेण्यास सांगितले. आठ दिवसांनी त्या मुलाला कर्करोग असल्याचे लक्षात आले. पण उपचार करण्यासाठी कुटुंबाची परिस्थिती नव्हती. मी त्याच्यावर मुंबईत उपचार केले. बरा झाल्यावर त्याने बीफार्म करून एखाद्या औषधाच्या दुकानात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मी दत्ताभाऊंना सांगितले, तर ‘या मुलाला चांगले गुण आहेत, इंजिनियरिंगला प्रवेश देऊ’, असे ते म्हणाले. पुढे त्याने इंजिनियरिंग पूर्ण केले, एमटेक झाला आणि आता त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. त्याचं संपूर्ण जीवन दत्ताभाऊंनी बदलून टाकलं,’ अशी आठवण ना. श्री. गडकरी यांनी सांगितली. त्याचवेळी अशी असंख्य उदाहरणं असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दत्ताभाऊ गोरगरिबांचे नेते होते – श्री. देवेंद्र फडणवीस
स्व. दत्ताभाऊ मेघे हे जनसामान्यांचे, बहुजनांचे, गोरगरिबांचे नेते होते. अतिशय गरिबीतून जीवनाची सुरुवात करत स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या पायावर ते उभे राहिले. कष्टाच्या पैशातून स्वतःचे शिक्षण पूर्ण केलं. युवकांचे संघटन उभे केले. चांगली प्रतिमा निर्माण केली आणि त्यानतंर मोठा राजकीय प्रवास सुरू झाला. आमदार, खासदार, मंत्री अश्या विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. सर्व लोक प्रेमाने त्यांना दत्ताभाऊ म्हणायचे. पण ते खऱ्या अर्थाने दाताभाऊ होते, या शब्दांत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.
नागपूर आणि वर्धा येथे स्मारके
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्व. दत्ता मेघे यांची दोन स्मारके करण्याचा विचार असल्याचे सांगितले. वर्धा आणि नागपूर अश्या दोन्ही ठिकाणी ही स्मारके असतील. वंचितांची सेवा करण्याचा दत्ताभाऊंचा वारसा पुढे नेण्याचे कार्य या माध्यमातून होईल व स्मारकाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्यांना त्यांची आठवण राहील, असा विचार ना. श्री. गडकरी व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मांडला.




