- Breaking News, विदर्भ

गडचिरोली समाचार : भाजपा गडचिरोली मंडळात पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान; मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे सरकारच्या कामगिरीवर सविस्तर मार्गदर्शन

गडचिरोली समाचार : भारतीय जनता पार्टी गडचिरोली मंडळाच्या वतीने आयोजित पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६ अंतर्गत आय फार्म, गोगांव (गडचिरोली) येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून “सरकारची कामगिरी आणि पक्ष संघटन बळकटी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाजपाचे उत्स्फूर्त सामुहिक गीत गात कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने निष्ठेने काम करावे, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मा.खा.डॉ. नेते यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत सांगितले की, या योजनांमुळे देशातील शेतकरी, महिला, गरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे. विशेषतः लाडकी बहिण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नधान्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यांसारख्या योजनांमुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, अपंग पेन्शन योजना, राष्ट्रीय कुटुंब सहाय योजना, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा योजना या योजनांमुळे गरजू नागरिकांना आधार मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात स्वच्छता आणि मूलभूत सुविधा वाढवण्यासाठी स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन यांसारख्या उपक्रमांनी मोठे परिवर्तन घडवले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी पुढे बोलताना डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात भाजप युवा मोर्चा पासून झाली असून संघटनेत काम करताना आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले. भाजप आदिवासी आघाडी मोर्चाचे सतत तीन वेळा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य केले. आदिवासी समाजाच्या समस्या मांडणे, त्यांचे हक्क मजबूत करणे आणि विकासाच्या प्रवाहात त्यांना आणण्यासाठी प्रयत्न केले.

तसेच गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार म्हणून दहा वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आले. त्यामध्ये वडसा–गडचिरोली रेल्वे मार्ग, जिल्ह्यात रेल्वे जाळ्याचा विस्तार, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प, कोनसरी स्टील प्लांट, गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, हवाई पट्टी, सुमारे १५ हजार कोटी रुपयांची विविध रस्ते विकास कामे, कोटगल बॅरेज, चिचडोह बॅरेज यांसारख्या सिंचन सुविधा, तसेच एकलव्य निवासी विद्यालये अशा अनेक विकासकामांची अंमलबजावणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची रुपरेषा

या प्रशिक्षण कार्यशाळेत सकाळी नोंदणी व चहा-नाश्ता, उद्घाटन सत्र, विविध विषयांवरील प्रशिक्षण सत्रे, कार्यपद्धती व सोशल मीडिया मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दुसऱ्या दिवशी व्यायाम, योग आणि समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रांमधून कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि जनसंपर्क कौशल्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, कि.मो.प्र. सचिव रमेशजी भुरसे, गडचिरोली मंडळाचे तालुका अध्यक्ष दत्तू सुत्रपवार, कि.मो. जिल्हाध्यक्ष विलास पा. भांडेकर, जेष्ठ नेते यशवंत झरकर,डॉ. बोदेले, आकाश सातपुते, बंडू झाडे, लोमेश कोलते, रुमनबाई ठाकरे, लोमेश कन्नाके, रमेश नैताम,डोईजड ताई, यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह स्नेहभोजनात सहभागी होत संवाद साधला. प्रशिक्षण कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन पक्षकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.