

मुंबई समाचार : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे ‘महायुती महासभेत’ उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. मुंबईकरांना खोटंनाटं सांगून भरकटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला यावेळी ‘सविनय आणि सपुरावा’ सुरुंग लावला.
कुणी तरी काल याच ठिकाणाहून वल्गना केल्या म्हणे, महायुती सत्तेत आली तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल. त्यांना मी इतकेच सांगू इच्छितो कि, कोणाचा बाप आला तरी कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. इतकी वर्षे मुंबई महानगरपालिकेत त्यांची सत्ता असूनही त्यांनी फक्त खुर्च्याच तोडल्या, त्यांच्यामुळेच मराठी माणूस मागे पडला आहे, ही सत्यपरिस्थिती आहे. ही निवडणूक मुंबईकर, मराठी माणूस यांच्या अस्तित्वाची नसून मराठी माणसाच्या मुळावर उठलेल्या विरोधकांच्या अस्तित्वाची आहे.

कालच्या सभेत काहींनी नक्कलही करून दाखवली, नक्कल करून काकांच्या पक्षाचे काय झाले इतकेच त्यांनी लक्षात ठेवावे. काकाकडे किमान नक्कल करण्याची आणि भाषण देण्याची तरी कला आहे, तुमच्याकडे तर तेही नाही.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर 5 वर्षांमध्ये नवी मुंबईमध्ये विमानतळ उभारले आणि आता तिसरे विमानतळ देखील तयार करणार आहोत. तसेच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दीडपट विस्तार देखील करणार आहोत. विरोधकांना स्वतःच्या घराची जागा कमी पडली म्हणून त्यांनी स्वतःचे घर बदलले, मग मुंबईच्या आर्थिक विकासासाठी आम्ही नवीन विमानतळ उभारले, तर इतका विरोध का?
आमच्या महायुती सरकारने त्रिभाषा सूत्राचा अहवाल मांडला, त्यात असे सांगितले की दोन भाषा कोणत्याही घ्या, पण मराठी सक्तीचीच राहणार. याउलट काही लोकांनी मुख्यमंत्री असताना इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची केली, परंतु ते आता ‘गजनी’ झाले आहेत, त्यांना हे आठवणार नाही. त्यांना कदाचित हेही आठवणार नाही कि, हिंदी सक्तीच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वाक्षरी केली होती! मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून विरोधकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे तेव्हाच स्पष्ट झाले आहे.
आमच्या महायुती सरकारने मुंबईमधील बीडीडी चाळीतील लोकांना हक्काचे घर दिले, पत्राचाळीतील लोकांना देखील हक्काचे घर दिले, मेट्रो आणि बससेवांमधून मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला. धारावीतील लोकांनाही पुनर्विकासातून हक्काचे घर देणार आहोत. खऱ्या अर्थाने मुंबईकरांचा विकास महायुती सरकार करत आहे. आता आम्ही केलेला विकास पाहून कोणाला मिर्ची झोंबली असेल, तर त्याला आमचा नाईलाज आहे.
2014 साली भारताची अर्थव्यवस्था जगात 11 व्या स्थानावर होती आणि आता ती तिसऱ्या क्रमांकावर आहे, आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उद्योगपतींनी योगदान दिले आहे. पण विरोधकांना आपल्याच भूमिपुत्रांना रोजगार द्यायचा नाही. परंतु, महायुती ही मुंबईमधील तरुणांना रोजगारही देईल आणि त्यांचे भविष्यही उज्ज्वल करेल.
मुंबईकरांनी मुंबईच्या खऱ्या आणि शाश्वत विकासासाठी येत्या 15 तारखेला भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे. पुढची 5 वर्षे मुंबईच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मा. केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी, भाजपा-महायुतीचे प्रमुख नेते व इतर मान्यवर उपस्थित होते.





