- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूरात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर समाचार : नागपूर जिल्ह्यात आज आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय लोक अदालत हा लोकांच्या समस्या त्वरित सोडविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले.

जिल्हा न्यायालय, नागपूर, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसूली न्यायाधीकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय आणि नागपूर जिल्हयातील सर्व तालूका न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये व नागपूर जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायमुर्ती न्यायमुर्ती अनिल किल्लोर व न्यायमुर्ती प्रफुल्ल खुबाळकर साहेब यांचे मार्गदर्शनाने तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी.सुराणा यांचे देखरेखीखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी दावे, भुसंपादन प्रकरणे, तडजोडी योग्य फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, विद्युत अधिनियमाचे प्रकरणे, पराकम्य संलेख अधिनियम, कलम १३८ ची प्रकरणे, कामगार वाद, रक्कम वसुली प्रकरणे, ग्राहक तकार, सहकार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे समोपचाराने निपटारा करण्यासाठी ठेवण्यात आली. लोक अदालतीला जिल्ह्यातील नागरिक व पक्षकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी ४,८८६ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले, तसेच दाखलपूर्व प्रकरणापैकी ७२,५६३ प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच नागपूर जिल्हयातील सर्व फौजदारी न्यायालयांमध्ये दिनांक ०८/१२/२०२५ ते १२/१२/२०२५ या कालावधीमध्ये विशेष अभियान राबवून फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २५६ व २५८ (कलम २७९ व २८१ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३) अन्वये एकूण ४,७५७ निरस्त फौजदारी प्रकरणे देखील निकाली काढण्यात आली.