- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरला सभापती राम शिंदे व मंत्री गिरीश महाजन यांची भेट

नागपूर समाचार : नागपूरमध्ये आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान भाजपा आमदार संदीप जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत करून सेंटरच्या कार्यपद्धतीची आणि उपलब्ध सेवांची सविस्तर माहिती दिली.

जनतेसाठी वाजवी दरात गुणवत्तापूर्ण सेवा

गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे नागपूरकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून विविध निदान चाचण्या वाजवी दरात उपलब्ध करून देत आहे. सीटी-स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, पॅथॉलॉजी, ईसीजी अशा अत्यावश्यक तपासण्यांची सुविधा येथे आधुनिक यंत्रणांसह करण्यात आली आहे. आरोग्य सेवांची सुलभता व परवडणारी किंमत या वैशिष्ट्यांमुळे हे केंद्र अल्पावधीतच नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे.

पाहणीदरम्यान समाधान व्यक्त

सभापती राम शिंदे यांनी सेंटरची रचना, उपलब्ध तंत्रज्ञान, कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता आणि रुग्णसेवेची पद्धत प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत नागपूरसारख्या वाढत्या शहरात अशा सुविधा मोठी गरज असल्याचे सांगितले. मंत्री गिरीश महाजन यांनीही आरोग्य क्षेत्रात अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली आणि योग्य दिशेने होत असलेल्या या प्रयत्नांचे कौतुक केले.

आरोग्यसेवेत महत्त्वाची भर

या भेटीत आमदार संदीप जोशी यांनी केंद्राची स्थापना करताना घेतलेल्या पुढाकाराची आणि त्यामागील जनसेवेच्या उद्देशांची माहिती दिली. “सामान्य नागरिकांना योग्य उपचाराबरोबरच योग्य तपासणी सुलभ व्हावी हा आमचा हेतू असून हे केंद्र त्याच दिशेने कार्यरत आहे,” असे ते म्हणाले. यावेळी सर्वश्री पराग सराफ, रितेश गावंडे उपस्थित होते.