- Breaking News, नागपुर समाचार, शीतकालीन सत्र

नागपूर समाचार : शेतकऱ्यांच्या वेदना विधानभवनाच्या पायऱ्यांवर, कापसाची माळ घालून विरोधकांचे आंदोलन

नागपूर समाचार : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेरच राजकीय वातावरण तापले. कापूस आणि सोयाबीनला मिळत नसलेला भाव, वाढते उत्पादनखर्च आणि शेतकऱ्यांची दिवसेंदिवस बिकट होत जाणारी अवस्था या सर्वांचा निषेध करत विरोधी पक्ष आज आक्रमक पवित्र्यात दिसला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गळ्यात कापसाच्या बोंडांची माळ घालून प्रवेश करताच सर्वांचे लक्ष वेधले. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या आमदारांनी मोठ्या संख्येने जमून घोषणाबाजी केली. “शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी!”, “कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती!” अशा घोषणा अख्ख्या परिसरात घुमत राहिल्या. निषेधाचे फलक आणि कापसाच्या गुंडाळ्या घेऊन विरोधकांनी सरकारच्या कृषी धोरणावर थेट हल्ला चढवला.

वडेट्टीवार म्हणाले की,विदर्भात अधिवेशन भरतंय, पण विदर्भातीलच शेतकरी कोसळलाय. कापूस सात हजाराच्या आसपास जातोय, सोयाबीनला तर भावच शिल्लक नाही. शेतकऱ्याला हमीभाव देण्याची सरकारची तयारीच दिसत नाही. मदत आणि खरेदी यंत्रणा वापरण्याऐवजी केवळ घोषणा करण्यात दिवस जात आहेत.”

अंबादास दानवे, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीतील इतर नेतेही या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी अधिवेशनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांनी मागणी केली की शेतमालाला न्याय्य दर मिळावा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जावी आणि शासकीय खरेदी केंद्रे नीट सुरू ठेवावीत. “शेतकऱ्याचा न्याय हा आमचा संघर्ष आहे. सरकार झोपेत असेल तरी आम्ही जागे आहोत,” असा इशारा देत वडेट्टीवारांनी लढा सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच शेतकरी प्रश्नाचा स्फोट झाल्याने येत्या दिवसांत हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.