- Breaking News

नवी दिल्ली समाचार : बौद्ध धर्माचे पालन करतो, पण खरंतर मी धर्मनिरपेक्ष; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे निवृत्तीपूर्वी मोठे वक्तव्य

नवी दिल्ली समाचार : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी एक महत्त्वपूर्ण विधान करून सर्वांचे लक्ष वेधले. “मी वैयक्तिक जीवनात बौद्ध धर्माचे पालन करतो, पण खरंतर मी धर्मनिरपेक्ष आहे. सर्व धर्मांवर माझा विश्वास आहे,” असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी गुरुवारी केले.

सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनच्या (SCSARA) निरोप समारंभात बोलताना गवई यांनी त्यांच्या आयुष्यातील आठवणी, मूल्ये आणि न्यायपालिकेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

राज्यघटनेने मला या पदापर्यंत आणले

गवई म्हणाले की,माझे वडील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते, ते धर्मनिरपेक्ष होते. त्यांच्याकडूनच मी बंधुता, समानता, मानवता शिकत आलो.”

बालपणी अनेक राजकीय कार्यक्रमांना वडिलांसोबत जाताना मित्र त्यांना कधी दर्ग्यावर, कधी गुरुद्वारात घेऊन जात असत.

“सर्व धर्मांच्या सहजीवनात मी वाढलो. त्यामुळे धर्मनिरपेक्षता ही माझ्या विचारधारेची मुळं बनली,” असे त्यांनी सांगितले.

गवई पुढे म्हणाले ,डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेमुळेच मी या सर्वोच्च पदापर्यंत आलो. अन्यथा नगरपालिकेच्या शाळेत जमिनीवर बसून शिकणाऱ्या एका मुलाने एवढं मोठं स्वप्न पाहणं कठीण होतं.”

त्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांनुसार जगण्याचा प्रयत्न केल्याचेही नमूद केले.

सर्वोच्च न्यायालय हे केवळ सरन्यायाधीश केंद्रीत नसावे

न्यायालयाच्या संरचनेवर बोलताना गवई यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.सुप्रीम कोर्ट हे फक्त सरन्यायाधीश केंद्रीत न्यायालय न राहता सर्व न्यायमूर्तींचे, सर्वांच्या योगदानाने चालणारे न्यायालय असावे,” असा त्यांचा विचार होता.

सहकाऱ्यांकडून कौतुक 

निरोप समारंभात न्यायमूर्ती कांत यांनीही सरन्यायाधीश गवईंच्या कार्याचे कौतुक केले.

त्यांनी म्हटले —गवई साहेब हे सर्वांमध्ये मिसळणारे, साधे, पाहुणचार करणारे आणि मानवीय दृष्टीकोन बाळगणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा अनुभव न्यायपालिकेसाठी एक मोठा ठेवा आहे.”

ते पुढे म्हणाले की,सेवानिवृत्तीनंतरही गवई सरांचे मार्गदर्शन न्यायव्यवस्थेला आणि संस्थांना मिळत राहील.”

23 नोव्हेंबर रोजी अधिकृत सेवानिवृत्ती- भूषण गवई 23 नोव्हेंबर रोजी औपचारिकरीत्या सेवानिवृत्त होत आहेत. शुक्रवारी त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील शेवटचा कामकाजाचा दिवस होता.