- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : वाद्यांच्या फ्यूजनची नागपूरकरांवर ‘संगीत मोहिनी’; ‘खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव-2025’चा तिसरा दिवस ठरला मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतानुभवाचा 

नागपुर समाचार : खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव-2025’च्या तिसऱ्या दिवशी बासरी, सतार, तबला, ड्रम्स आणि विविध वाद्यांच्या फ्यूजनने नागपूरकरांवर संगीत मोहिनी घातल्याचे दृश्य दिसून आले. सुप्रसिद्ध बासरी वादक रोणू मुजुमदार यांनी तयार केलेल्या राग हंसध्वनीमध्ये ‘डांसिंग विथ द बीट’ च्या प्रस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि अक्षरशः संपूर्ण पटांगण परिसर फ्यूजन संगीतात न्हाऊन निघाला. 

हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर ड्रम्स आर्टिस्ट गौतम शर्मा आणि नीलेश मोरे, सुप्रसिद्ध संगीतकार आणि जॅझ क्षेत्रात महारत असलेले अतुल रनिंगा, बेस गिटारवर हुकूमत असणारे प्रतिभावान संगीतकार मनीष कुलकर्णी, गायकी अंगाने सतार वाजविणारे स्वीकार कट्टी, लोकप्रिय संगीतकार मैसूर मंजुनाथ महादेवाप्पा, पद्मश्री आणि सुप्रसिद्ध बासरी वादक रोणू मुजुमदार यांनी कार्यक्रमाची संगीतमय सुरवात केली आणि त्यानंतर पॉप आणि रॉक प्रकारात तबल्यावर विशेष वर्चस्व असलेले बिक्रम घोष आणि अत्यंत प्रतिभावान आणि तालवाद्यांवर सरस असे तौफिक कुरेशी यांची त्यांना साथ लाभल्याने श्रोते-प्रेक्षक याना संगीताचा परमानंद मिळाला. 

भारत रत्न पंडित रवीशंकर यांनी शिकविलेल्या राग कलावती मधील जनसंमोहिनी सम असलेले ‘बॅक टु द रुट्स’ ने तर प्रेक्षकांना सांगीतिक आनंदाच्या परमोच्च शिखरावर नेले. त्यानंतर झपतालमधील राग बागेश्रीच्या प्रस्तुतीने वातावरण भारावून गेले. बिक्रम आणि तौफिक यांच्या ‘रमता’ फ्यूजन ने सगळ्यांना चकित केले.

तत्पूर्वी, खासदार मध्ये वादन करण्यासाठी ‘खास’ असावे लागते आणि आज आपण इथे संगीताचे जाणकार श्री. नितीन गडकरी यांना ही संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो, असे पद्मश्री आणि सुप्रसिद्ध बासरी वादक रोणू मुजुमदार यावेळी म्हणाले. खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे विदर्भातसंगीताचा प्रचार प्रसार झाल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले. 

आजच्या कार्यकमाला केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, कांचनताई गडकरी, राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, नामवंत सर्जन डॉ. मुजफ्फर लकडावाला, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर, डॉ. मंजूषा मार्डीकर, उद्योगपती अतुल गोयल, हॉटेल सयाजीचे अनिल नायर, हॉटेल अशोकाचे संजय गुप्ता, एलआयसीचे नीलेश साठे, उत्तरप्रदेशचे विधायक श्री विपिन वर्मा या सर्वांनी दीपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली. रिचा सुगंध आणि बाळ कुळकर्णी, रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. 

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.

फोटो गैलरी…