- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपुरात ‘मिशन २०२७’ अंतर्गत भव्य विदर्भ आंदोलन; स्वतंत्र विदर्भासाठी १६ डिसेंबरला ‘लाँग मार्च’

नागपूर समाचार : विदर्भ राज्य आंदोलन समितीने (वि.रा.आ.स.) ‘मिशन २०२७’ जाहीर करत २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणारच, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातून सुरू झालेली विदर्भ राज्याची चळवळ आता शहरी पातळीवर जोर धरत असून, १६ डिसेंबर २०२५ रोजी नागपुरात भव्य ‘लाँग मार्च’ आणि ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे.

हा लाँग मार्च इतवारी येथील ‘विदर्भ चंडीका मंदिर’ शहीद चौकातून सकाळी १२ वाजता सुरू होऊन चिटणीस पार्कवर दुपारी १ वाजता संपेल. चिटणीस पार्कवर जनसंकल्प मेळाव्यात विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनतेचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला जाईल.

वि.रा.आ.स.च्या बैठकीत अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खदिवाले यांच्या अध्यक्षतेखाली आज (३ नोव्हेंबर) राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक पार पडली. यात अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, महिला अध्यक्षा रंजनाताई मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत तात्यासाहेब मत्ते यांची विदर्भ प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. समितीने महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर तीव्र टीका करत म्हटले की,राज्याचे महसुली उत्पन्न ५.६० लाख कोटी असून, कर्ज व व्याजाचा बोजा जवळपास ९.८३ लाख कोटी आहे. याशिवाय सरकारकडे ९५ हजार कोटींच्या प्रलंबित देयकांची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

“विदर्भ राज्य निर्मिती हेच या सर्व समस्यांचे खरे उत्तर आहे,” असा संदेश देत समितीने सर्व नागरिकांना १६ डिसेंबरच्या नागपूर लाँग मार्चमध्ये सक्रीय सहभागाचे आवाहन केले आहे.