- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : आपल्या व्यावसायिक कल्पनांना प्रत्यक्ष साकारण्यासाठी तत्परतेने कृतीची जोड द्या – कार्यकारी कुलगुरु डॉ. माधवी खोडे-चवरे

नागपूर समाचार : विद्यार्थ्यांना आपल्या स्वयंरोजगाराचे मार्ग मिळणे सुलभ व्हावेत, आपल्या मनातील कल्पना शक्तींना व्यावसायिक आकार देता यावा यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आम्ही विविध पातळीवर प्रयत्नरत आहोत. विद्यापीठ परिसरात

यासाठी स्वतंत्र इनक्युबिशन सेंटर कार्यरत केले आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या रोजगार व स्वयंरोजगाराबाबतची माहिती ॲपच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी यासाठी आरटीएमएनयु स्टुडंट डेव्हलपमेंट ॲप विकसीत केले आहे. व्यवसायाबाबत आपली जी काही कल्पना असेल त्या कल्पनेला प्रत्यक्ष साकारण्यासाठी तत्पर व्हा, असे आवाहन अपर विभागीय आयुक्त तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरु डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय पातळीवरील नवउद्योजकांच्या क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमास सिडबीच्या एस. लक्ष्मी, बी. आर. शिरसाट, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या राज्‍य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी, विभागीय अधिकारी एच. आर. वाघमारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, अनिल पाटील व मान्यवर उपस्थित होते. 

युवकांनी आपल्या मनात जर एखाद्या व्यवसायाची कल्पना आली तर त्याला प्रत्यक्षात साकारण्यासाठी तत्काळ निर्णय घेऊन स्वत:च्या कष्टाची जोड दिली पाहिजे. आपल्यात क्षमता विकसीत करुन घेतल्या पाहिजेत. कोणताही व्यवसाय हा लहानातून मोठा होत जातो. त्यासाठी छोट्यातील छोटी सुरुवात ही तेवढीच महत्वाची ठरते असे कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोंडे-चवरे यांनी सांगून जे व्यवसाय करत आहेत त्यांनी त्यात अधिक मूल्यवृध्दी, सुलभता आणण्यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच. आर. वाघमारे यांनी केले. कोरोना काळात अनेक लहान उद्योग व्यवसायांना व्यवसायाअभावी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. यातून त्यांना सावरण्यासाठी सूमारे 9 हजार लघु उद्योगांना प्रशिक्षण देऊन क्षमता वृघ्दी करण्यात आली आहे. हा उपक्रम क्षमता वृद्धीचा भाग असून आजवर सूमारे 18 लाख उद्योजक उद्योग विभागाने घडविल्याचे वाघमारे यांनी सांगितले. 

भारतात 36 टक्के उत्पादन हे लघु उद्योजकांच्या मार्फत केले जाते. 45 टक्के आपण एक्सपोर्ट करतो. रॅम्प हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम असून यात विविध बाबींचे प्रशिक्षण आम्ही पूर्ण करीत असल्याची माहिती बी.आर. शिरसाट यांनी दिली.