नागपूर समाचार : आदिवासी उडाण बहुउद्देशीय विकास संस्था, नागपूर च्यावतीने 5 ऑक्टोंबर रोजी भारताच्या शूर गोंडवाना साम्राज्ञी विरांगणा राणी दुर्गावती दलपत शहा मडावी यांची जयंती गोंडवाना विकास मंडळ नागपूर येथे दिप प्रज्वलन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. वीरांगना राणी दुर्गावती या गोंड राज्याच्या एक शूर राणी होत्या, ज्या १५२४ ते १५६४ या काळात गादीवर होत्या. त्यांनी १५ वर्षे गोंड राज्यावर राज्य केले आणि अनेक युद्धांमध्ये पराक्रम गाजवला. अकबराच्या मुघल सैन्यालाही त्यांनी झुंज दिली आणि शरणागती पत्करण्याऐवजी स्वतःला शहीद केले.
राणी दुर्गावती यांचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ रोजी बांदा (उत्तर प्रदेश) येथील कालिंजर किल्ल्यात चंडेला राजघराण्यात झाला होता. त्यांचा विवाह गोंड राज्याचा राजा संग्राम शाह यांचा मुलगा दलपत शाह यांच्याशी झाला. पतीच्या मृत्यूनंतर, त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाच्या वतीने गोंड राज्याची सूत्रे हाती घेतली आणि १५ वर्षांहून अधिक काळ राज्य केले. त्यांनी ५१ शौर्यपूर्ण युद्धे लढली आणि अनेकदा मुघल सैन्याचा पराभव केला.
आपल्या शेवटच्या युद्धात, गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी शरणागती पत्करली नाही. त्याऐवजी, त्यांनी खंजीर खुपसून आत्मबलिदान दिले आणि स्वतःला शहीद केले. त्यांच्या या शौर्यामुळे त्या भारतीय इतिहासातील एक महान वीरांगना म्हणून ओळखल्या जातात.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक श्रीमती रमाताई मसराम यांनी इतिहास सांगितले तसेच दिनेश सिडाम यांनी महिला सक्षमीकरण व सबळीकरण याबद्दल मार्गदर्शन केले.
श्रीमती नलिनीताई दडांजे सौ.गंगाताई टेकाम, सौ.लताताई आत्राम, सौ.किर्तीताई युवनाते, सौ.ज्योतीताई कन्नाके, सौ.शिलाताई मरस्कोल्हे, सौ. मिनाताई कोडापे, सौ.प्रितीताई पंधराम, सौ.नम्रताताई टेकाम, सौ.प्रतिमाताई वरठे, सौ.मिनाताई कोकर्डे, सौ.नेहाताई पूराम, सौ.संगिताताई भलावी, मुकूंद मडावी, सुधाकर परतेती, विजय मसराम, विजय आत्राम, किष्णा सरोते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ.गंगाताई टेकाम तर आभार सौ.लताताई आत्राम यांनी मानले.




