ऊस वाहतूक वाहनांवर साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबवावी
नागपूर समाचार : दिवाळी व इतर सणासुदीच्या दिवसात ऊस कारखान्याचा हंगाम हा अनेक भागात सुरु होतो. विदर्भात सहकारी साखर कारखान्यांचे व्यापक जाळे जरी नसले तरी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या पाठीमागे टेललॅम्प अथवा रिफ्लेक्टर सुस्थितीत दृष्यस्वरुपात जोपर्यंत वाहनांवर राहत नाहीत तोपर्यंत अपघाताचा धोका हा कमी होत नाही. अशा बेफिकीर वाहनांमुळे यापुढे रस्ते अपघातात कोणी बळी पडू नये अथवा गंभीर जखमी होऊ नये याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. याचबरोबर जे वाहनचालक याबाबत हलगर्जीपणा करतील अशा वाहनचालकाविरुध्द व वाहनांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मा. उच्च न्यायालयामध्ये ऊसतोड कामगारांच्या समस्या व प्रभावी नियोजनाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांच्या विविध समस्यांचे निराकरण हे ते ज्या ठिकाणी कामासाठी जातात त्या ठिकाणी होणे आवश्यक आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व इतर सेवासुविधांबाबत ऊर्जा व कामगार, महिला व बालविकास, शालेय शिक्षण या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी कोणतीही कसर ठेवू नये, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. ऊस वाहतूक वाहनांवर साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबवावी असे त्यांनी सांगितले.
तृतीयपंथीयांच्या महसूली प्रमाणपत्रांसाठी विशेष शिबीर
सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक किन्नरांना व्हावा यासाठी संबंधित यंत्रणेने दक्ष होऊन काम केले पाहिजे. महसूल विभागांतर्गत असलेले विविध प्रमाणपत्र प्रत्येक किन्नरांना मिळाले पाहिजेत. यादृष्टीने लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अथवा समाजिक न्याय भवन परिसरात विशेष शिबीर घेतले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तृतीयपंथीयांच्या आढावा बैठकीत सांगितले. याचबरोबर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.




