राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम
सूती कपड्यांवर कलमकारी अर्थात ब्लॉक प्रिंटींग व शिलाई प्रशिक्षणाचा शुभारंभ
दरवर्षी 1 हजार महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी
6 कोटी रुपये निधीची उपलब्धता
नागपूर समाचार : ज्या भक्तीभावातून आपण देवीची आराधना करतो तोच भक्तीभाव व श्रध्दा आपण हाती घेतलेल्या कामाप्रती ठेवल्यास यात यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. कोराडी येथील आदिशक्ती म्हणून श्रध्दा असलेल्या महालक्ष्मी देवी संस्थानच्या परिसरात घटस्थापनेचे औचित्य साधून आदिशक्ती ते नारीशक्ती हे अभिनव अभियान आपण महिला सक्षमीकरणासाठी सुरु करत आहोत. या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रत्येक महिला नाविण्य व कौशल्याची कास धरत या केंद्राला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवतील, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
कोराडी मंदिर परिसरात जिल्हा नियोजन समिती व महिला आर्थिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या कलमकारी गारमेंट क्लस्टरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी माविमचे विभागीय सल्लागार राजु इंगळे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे, श्री. गुल्हाणे व अधिकारी उपस्थित होते.

या प्रशिक्षण केंद्रातून सूमारे 1 हजार महिलांना दरवर्षी निरंतर प्रशिक्षण सुरु राहणार आहे. ज्या महिलांना त्यांच्या कौशल्याच्या बळावर येथे संधी मिळेल त्या महिलांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले. दिवसभर काम केल्यानंतर जो मोबदला त्यांना दिला जातो त्यातून त्यांचे किमान घर चालले पाहिजे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे आपल्याला या प्रकल्पासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मिळाला. हा निधी अधिकाधिक सत्कारणी लागावा, यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी असू नयेत याची काळजी घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी त्यांच्या हस्ते सूती कपड्यावर कलमकारी अर्थात ब्लॉक प्रिंटींग युनीट व शिलाई प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानांतर्गत उत्पादित होणारे ड्रेस मटेरियल, रेडिमेट ड्रेसेस व इतर उत्पादने ॲमेझानद्वारेही विक्री केले जाणार आहेत. मंदिर परिसरातही याचे विक्री केंद्र असेल. प्राथमिक स्तरावर कोराडी परिसरातील प्रत्येक गावातील महिलांनी पुढे यावे, प्रशिक्षणात सहभाग घ्यावा व स्वयंरोजगाराला बळ मिळावे या दृष्टीने भविष्यात दोन-दोन गावाचे क्लस्टर तयार केले जाणार आहे. प्रशिक्षीत झालेल्या महिलांना त्यांच्या गावातच स्वयंरोजगाराची संधी यातून निर्माण होईल. येथील निर्माल्यापासून चांगल्या अगरबत्त्या करण्यावरही भर असेल. शाश्वत शेती, शाश्वत रोजगार व निरंतर विकास या त्रीसुत्रीवर हे अभियान पुढे जाईल.




