मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या दिव्यांग सर्वेक्षणामध्ये निदर्शनास आलेल्या युडीआयडी कार्ड पासून वंचित दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी २२ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात संबंधित विभागांशी योग्य समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
दिव्यांगांचा एकत्रित डाटा संकलीत करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून आशा सेविकांमार्फत दिव्यांग सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार युडीआयडी कार्ड पासून वंचित दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्याकरिता ‘एसोपी’ निर्धारित करण्याकरिता गठीत समितीची बैठक गुरुवारी (ता.१८) पार पडली.
मनपा आयुक्त यांच्या सभाकक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उपायुक्त डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. स्नेहल शंभरकर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. धर्मेंद्र मिश्रा, डॉ. समता भटनागर, मनपा अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात मनपाच्या माध्यमातून ‘लोकोमोटर’ प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड तयार करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात शहरामध्ये २४ हजार ६३८ संभाव्य दिव्यांग असलेल्याचे निदर्शनास आले. यातील ९४७६ दिव्यांगांकडे युडीआयडी कार्ड आहे. तर १५ हजार १६२ दिव्यांग कार्ड पासून वंचित आहेत.
कार्ड नसलेल्या या संभाव्य दिव्यांगांची तपासणी करून युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी प्रारंभी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये विशेष शिबीर २२ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. ५० वर्षाखालील युडीआयडी कार्ड नसलेल्या ‘लोकोमोटर’ प्रकारातील दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींकरिता प्राधान्याने हे शिबीर असणार आहे. टप्प्याटप्प्याने पुढे देखील शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
यासंदर्भात नागपूर महानगरपालिका द्वारा लाभार्थी दिव्यांगांना झोननिहाय फोन व मेसेज द्वारे माहिती दिली जाणार आहे. मेसेजमध्ये कार्ड करिता आवश्यक कागदपत्रांची यादी व लोकेशन असावे, असे आयुक्तांनी नमूद केले. जास्तीत जास्त दिव्यांगांचे कार्ड काढण्याबाबत सुरळीत प्रक्रिया व्हावी यासंदर्भात भेडसावणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने दिव्यांग विभागाच्या आयुक्तांशी पत्रव्यवहार करण्याबाबत आयुक्तांनी सूचित केले.




