अधिकाऱ्यांचा हिस्सा असल्याचा संशय, जनतेची कडक कारवाईची मागणी
नागपूर समाचार : नागपूरमध्ये स्टॅम्प पेपर विक्रीच्या नावाखाली जनतेची सरळसरळ लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टॅम्प विक्रेता शासकीय दरापेक्षा तब्बल ८ ते १० टक्के जास्त पैसे नागरिकांकडून वसूल करत असल्याची माहिती उघड झाली आहे. एवढेच नव्हे तर, जास्तीचे पैसे का घेतले जातात असा प्रश्न विचारल्यास, “स्टॅम्प पेपर उपलब्ध नाहीत” असे सांगून नागरिकांना फसवले जाते.
सर्वात गंभीर बाब म्हणजे हे संपूर्ण गैरप्रकार थेट शासकीय कार्यालयांच्या प्रांगणात उघडपणे सुरू आहेत. त्यामुळे जनतेमध्ये चर्चा आहे की, या लूटप्रकरणात काही हिस्सा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जात असल्यानेच या विक्रेत्यांवर कारवाई होत नाही.
नागरिकांची व्यथा
दररोज कामानिमित्त स्टॅम्प पेपर घेणाऱ्या नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
एका नागरिकाने सांगितले
“आम्हाला सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा तब्बल १० टक्के अधिक पैसे द्यावे लागतात. जर आम्ही विरोध केला, तर ‘स्टॅम्प पेपर उपलब्ध नाहीत’ असे सांगून आम्हाला कामासाठी भाग पाडले जाते. हा सरळसरळ अन्याय आहे.”
या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम घेणे हा थेट कायद्याचा भंग असूनसुद्धा अशा विक्रेत्यांवर कारवाई न होता त्यांना मोकळीक दिली जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “संपूर्ण घोटाळ्याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत.”
जनहितासाठी मागणी
स्टॅम्प पेपर विक्रीतील या काळाबाजाराविरुद्ध तातडीने कारवाई करावी.
दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा व्हावी.
संबंधित शासकीय कार्यालयांमधील मिलीभगत उघड करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी.
जनतेला जास्तीचे पैसे द्यावे लागू नयेत म्हणून कठोर यंत्रणा उभारावी.
जनतेचा सवाल अगदी थेट आहे : “शासकीय कार्यालयांच्या आवारातच नागरिकांची लूट होत असेल तर यामागे कोणाचा हात आहे?”
प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी तत्काळ कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.