आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून गणेशभक्तांसाठी विशेष व्यवस्था
नागपूर समाचार : गणपती मूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून चिटणीस पार्कमध्ये १५ विसर्जन केंद्रांची व्यवस्था केली आहे. या गणेश मूर्ती स्वीकार केंद्राचे उद्घाटन विधिवत पूजा करून आमदार प्रवीण दटके यांच्या प्रमुख उपस्थितीत कौस्तुव चॅटर्जी इतर मान्यवरांच्या हस्ते (ता. ४) करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या विसर्जन केंद्रात गणेश भक्तांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन आमदार प्रवीण दटके यांनी यावेळी केले.
यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त राजेश भगत, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, माजी महापौर अर्चना डेहनकर, ग्रीन व्हिजिलचे संस्थापक कौत्सुव चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ स्वानंद सोनी, मराठा लान्सर्सचे वीरसिंह जाधव, मूर्तीकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बारापात्रे, माजी नगरसेविका सरला नायक, संजय चिंचोळे उपस्थित होते.
यावर्षी नागपूर महानगरपालिकेतर्फे सर्व गणेश भक्तांना विसर्जनासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. शहरात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. स्व. प्रभाकरराव दटके यांच्या स्मृतीनिमित्त आमदार प्रवीण दटके यांनी चिटणीस पार्कमध्ये १५ विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे. या सर्व कुंडांना प्रमुख नद्यांची नावे देण्यात आली आहेत. यातील ८ विसर्जन कुंड २० फूट लांब व १२ फूट रुंद आहेत. ५ विसर्जन कुंज १५ फूट लांब व ९ फूट रुंद आहेत. तर २ विसर्जन कुंड १२ फूट लांब व ८ फूट रुंद आहेत. या कुंडांना गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी, उल्हास, पेंच, भीमा, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा अशा नद्यांची नावे देण्यात आली आहेत. विसर्जन ठिकाणी भावगीतांचे संगीतासह भक्तीपूर्ण वातावरण गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा आनंद गणेश भक्तांनी घ्यावा, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
या कुंडांचे विधिवत पूजन आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रत्येक कुंडांचे पूजन उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले. कार्यक्रमाची भूमिका महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर यांनी मांडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गणेश भक्तांना गणपती मूर्तींचे विसर्जन करताना अडचणी किंवा समस्या येऊ नये या उद्दात हेतूने आमदार प्रवीण दटके यांनी पुढाकार घेऊन ही व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत उपायुक्त राजेश भगत यांनी महानगरपालिकेचा मानाचा दुपट्टा व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन केला. याचवेळी आमदार दटके यांचाही सत्कार मानाचा दुपट्टा व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन करण्यात आला.
गणेश मूर्ती स्वीकार केंद्राचे वैशिष्ट्य
१. चिटणीस पार्कच्या सर्व दरवाजातून गणेश भक्तांना गणेश मूर्ती आणता येणार आहे.
२. विविध आकाराचे १५ कुंड असल्याने गणेश भक्तांना अधिक काळ ताटकळत राहावे लागणार नाही.
३. विसर्जन करताना भक्ती गीते वाजविली जाणार असल्याने भक्तीपूर्ण वातावरण होणार आहे.
४. रात्रीच्यावेळी सुद्धा रोषणाई व विद्युत व्यवस्था करण्यात आल्याने गणेश भक्तांना त्रास होणार नाही.
५. या विसर्जन कुंडांची डिझाईन स्वस्तिकच्या आकारात करण्यात आले आहे.
६. विसर्जनाच्यावेळी निर्माल्य संकलित करण्यासाठी त्याचठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले आहेत.




