आ. विकास ठाकरे, अभिजित वंजारी सह काँग्रेस नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन : निषेध आंदोलनात घोषणाबाजी
नागपूर समाचार : पूर्व नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ आमदार अभिजित वंजारी, यांच्या जनसंपर्क कार्यालयावर काही समाजकंटकांनी काळे फासून केलेल्या हल्ल्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध केला. हा पूर्वनियोजित कट असून आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारीं यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ सतरंजीपुरा येथील सुभाष पुतळ्यासमोर घेतलेल्या आंदोलनात ‘गुन्हेगारांना अटक करा’, ‘शांतता भंग करणाऱ्यांना शिक्षा करा’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश महासचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, माजी मंत्री अनिस अहमद, माजी महापौर नरेश गावंडे, ज्येष्ठ नेते गिरीश पांडव, माजी नगरसेवक प्रशांत धवड, माजी नगरसेवक नितीन साठवणे, श्रीमती नयना झाडे, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, पृथ्वी मोटघरे, राजेश पौनीकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. घटनेतील आरोपी समाजकंटकांवर कठोर कलमे लावून तात्काळ अटक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
यानंतर आ. विकास ठाकरे आणि आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ३१ ऑगस्ट रोजी घडलेली ही घटना साधी नसून नियोजित स्वरूपाचा हल्ला आहे. लोकप्रतिनिधीच्या कार्यालयावर हल्ला होणे हे कायदा व सुव्यवस्थेला दिलेले खुले आव्हान आहे. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध असून त्यात १० ते १२ जणांचा गट सामील असल्याचे स्पष्ट दिसते. तरीही पोलिसांनी गंभीर कलमे लावलेली नाहीत.
वंजारी यांनी स्पष्ट केले की, शांतता भंग करून वातावरण ढवळून काढण्याचा कट या समाजकंटकांनी रचला होता. आमचे कार्यकर्ते भडकले असतानाही मी त्यांना कायद्याचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. मात्र पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली नाही, हे दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी देखील त्यांच्या कार्यालयावरील फलकावर समाजकंटकांनी आक्षेप घेत निदर्शने केली होती. त्या संदर्भात २२ जणांची नावे पोलिसांकडे देण्यात आली होती, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांचे मनोबल वाढल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनात केला.
काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनात आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्याची तसेच पुढील काळात आमदार आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
निषेध आंदोलनात माजी नगरसेवक मिलिंद दुपारे, मनीष उमरेडकर, मनोज नोकरकर, चंदाभाऊ राऊत, अनिल बारापात्रे, युवराज वैद्य, योगेश कुंडलकर, धनराज अतकरी, अनिल हजारे, कुमार बावनकर, मुकेश गजभिये, परमेश्वर राऊत, प्रवीण बेलेकर, इर्शाद अली, बाबु जिनानी, मोहसीम, निर्मला बोरकर, रुचिका ताई डफ, श्रीमती धार्मिक आदी सहभागी झाले होते.
आयुक्तांनी दिले कडक कारवाईचे आश्वासन
घडलेला प्रकार गंभीर आहे. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करून त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करू. तपासात आणि कारवाई करण्यात हलगर्जीपण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिले.