नागपूर समाचार : गणरायाच्या आगमनानंतर दोन दिवसाने महालक्ष्मीचे घरोघरी आगमन होते. यास महालक्ष्मी माहेरला येते, असे म्हटले जाते. ज्येष्ठा, कनिष्ठा या आपला मुलगा व मुलीसह माहेरी येतात. त्यांच्यासाठी सडा, रांगोळी करून मायेच्या पायघड्या घातल्या जातात. त्यांच्या स्वागताला सारं घर आनंदाने न्हाऊन निघतं. तीन दिवसांचं त्यांचं माहेरपण; पण त्यात मायेचे कोड कौतुकाचे किती पदर दिसतात. त्या कौतुकाचंच तर नाव माहेर असतं. पहिल्या दिवशी तिचे जोरदार स्वागत केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजन करून नैवेद्य दिला जातो आणि तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीला निरोप दिला जातो. या दिवशी गृहिणी एकामेकींच्या घरी जाऊन तेथील महालक्ष्मीचे दर्शन घेतात.
१६ भाजी अन् आंबिलचा प्रसाद
ज्येष्ठा-कनिष्ठांचे आगमन झाल्यानंतर पाहुणचारामध्ये १६ भाज्यांना एकत्रित करून एक भाजी करण्याची पद्धत आहे. याकरताि बाजारांमध्ये भेंडी, गिलके, तोडरी, कोबी, गवार, कटुले, चवळीभाजी, कोहळ, दोडकी यासारख्या भाज्यांचा समावेश वाट्यात होता. सोबतच आंबिलच्या प्रसादाचादेखील पंचपक्वान्नांमध्ये समावेश असतो. याशिवाय करंजी, पुऱ्या, लाडूचा फराळ देखील तयार झाला असून गौरी पूजनाप्रसंगी फुलोरा लावण्यात येताे. तर पुरणाच्या पाेळीचा मुख्य नैवेद्य या वेळी गाैरीला दिला जाताे.