- Breaking News, मुंबई समाचार

नागपूर समाचार : नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याचे कार्य सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा

मुंबई समाचार : इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो आहे. नागपूरसह इतर ठिकाणी ही तलवार पोहोचेल आणि त्यामुळे आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला, हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत सेना साहिब सुभा श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मुधोजी राजे भोसले, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार संजय उपाध्याय, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार संजय कुटे, सचिव डॉ.किरण कुलकर्णी, संचालक मीनल जोगळेकर, संचालक डॉ.तेजस गर्गे, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नागपूरच्या भोसल्यांचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास असून, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, युनेस्को मानांकन १२ किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, अशा विविध वारशांद्वारे आपण आपल्या इतिहासाशी पुन्हा जोडले जात आहोत. हा देदिप्यमान इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे हे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत.

मराठा साम्राज्याच्या समृद्ध खुणा, वस्तू आणि वारसा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला समृद्ध वारसा असणाऱ्या हजारो ऐतिहासिक वस्तू परत मिळवण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया यापुढेही अशीच सुरु राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीमंत रघुजी राजे भोसले यांची तलवार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक – मंत्री ॲड.आशिष शेलार

ब्रिटिश काळात लुटून नेलेल्या आपल्याच शौर्याच्या, पराक्रमाच्या, मराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणारी प्रथम रघुजी राजे भोसले यांची तलवार अखेर महाराष्ट्रात परत आली आहे. ही केवळ एक वस्तू नाही, तर आपल्या पिढ्यांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर उभे राहून रघुजी राजे भोसले यांनी मराठा साम्राज्य बंगाल, ओडिसा, तेलंगणापर्यंत विस्तारले. “ही तलवार परत मिळवणे म्हणजे सांस्कृतिक पुनर्जन्म आहे. उद्याच्या पिढ्यांना ही प्रेरणा देणारी घटना ठरणार आहे.”

“छत्रपतींच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवून देणे असो, किंवा रघुजी राजे भोसले यांची तलवार परत आणणे असो, हीच खरी ‘विरासत से विकास तक’ची संकल्पना आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, शौर्य आणि गणेशोत्सवासारखे उत्सव जागतिक पातळीवर पोहोचवणे हा आमचा संकल्प आहे.”

यावेळी श्रीमंत रघुजी राजे भोसले यांचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मराठ्यांचा दरारा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *