- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना वेळेत पूर्ण करा – वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

रोपवेच्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश

नागपूर समाचार : विदर्भातील पर्यटन आणि तिर्थक्षेत्रात रामटेकचे अनन्य साधारण महत्व असून याठिकाणी स्थानिकांना रोजगार निर्मितीची विविध संसाधणे उपलब्ध होण्यासाठी रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखडा आपण तयार केला आहे. या आराखड्यामध्ये रोपवेची सुविधा, सर्व सुविधायुक्त यात्री निवास, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणारी गडमंदिर परिसरात नियोजनबद्ध दुकानांची गाळे, भव्य पार्कीग सुविधा आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याला महत् प्रयासाने काही निधी उपलब्ध करुन दिला असून वनविभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, राज्य व केंद्र शासनाचे पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी परस्पर समन्वयातून तात्काळ या कामांना प्राधान्याने गती देण्याचे निर्देश वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखडा टप्पा-2 याला गती देण्यासाठी वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

पर्यटन विकासाच्यादृष्टीने रामटेक येथे पूर्ण क्षमता आहेत. येथील तलाव, श्री चक्रधर स्वामी मंदिर, श्रीराम मंदिर, अंबाडा तलाव, शांतीनाथ जैन मंदिर, जवळच असलेला खिंडसी तलाव आदी नैसर्गिक साधनसंपती विपुल प्रमाणात आहे. सर्व क्षेत्राच्या विकासासाठी नियोजनबद्ध एकत्रित विकास आराखडा हा दूरदृष्टी ठेवून आम्ही साकारत असून ज्या कामांना शासकीय निधी उपलब्ध आहे त्या कामात कोणत्याही परिस्थितीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *