नागपूर समाचार : दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत स्तनपान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
मनपाच्या इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लता मेडिकल रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, इंदोरा युपीएचसी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सांची जैस्वाल, आरोग्य कर्मचारी सिल्विया मोरडे, शीला सयाम, लता मेडिकल रिसर्च फाउंडेशनच्या आहार समुपदेशक डॉ. शिल्पा भैसे, प्रकल्प समन्वयक मधुलिका शर्मा, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. समरीन सदाफ खान, डॉ. रुचा सावजी यांच्यासह आशा सेविका, परिसरातील स्तनदा माता, गर्भवती महिला उपस्थित होत्या.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात जागतिक स्तनपान सप्ताहच्या अनुषंगाने मनपाच्या विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्तनपान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. दहाही झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात स्तनदा माता व गर्भवती महिलांना स्तनपानाचे महत्व पटवून देण्यात आले. शून्य ते सहा महिन्यापर्यंत बाळासाठी आईचे दुध हे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे बाळाला स्तनपान करताना आईने आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. यासंदर्भात कार्यक्रमात विशेष प्रकाश टाकण्यात आला. आईसाठी महत्वाचा आहार व त्यामुळे बाळाला मिळणारे पोषण यावर मार्गदर्शन करण्यात आले.
स्तनपान करताना आईने घ्यावयाची काळजी, स्तनपान करताना बाळाला पकडण्याची पद्धत, स्तनपानानंतर कसे हाताळावे, स्तनपानादरम्यान बाळाला त्रास झाल्यास घ्यावयाची काळजी, येणाऱ्या अडचणी या सर्वांबाबत आशा सेविकांनी प्रातिनिधिक ‘मॉडेल’चा उपयोग करून कार्यक्रमात प्रात्यक्षिक सादर केले.