- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : पारदर्शकता आणि लोकाभिमुखता यासह जनतेच्या कामांना सर्वाधिक प्राथमिकता – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनखाली

महसूल सप्ताहानिमित्त विविध लोकाभिमुख उपक्रमाचे आयोजन

महसूल सप्ताहाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार उदघाटन

नागपूर समाचार : सर्व सामान्यांची महसूल विभागाशी निगडीत असलेली कामे तत्परतेने मार्गी लागावीत, महसूल विभाग अधिक लोकाभिमुख व्हावा, शासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि निर्णय तत्परता प्रत्येकाला प्रत्ययास यावी यासाठी महसूल विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली या विविध उपक्रमासह महसूल दिन व महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावपातळीवर नागरीकांच्या महसूल विभागाशी असलेल्या शंकाचे समाधान करु असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.  

दिनांक 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत शासनातर्फे लोकाभिमुख पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस अपर आयुक्त तेजूसिंग पवार अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महीरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे उपस्थित होते.

महसूल मंत्री तथा पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, उत्कृष्ट संवाद अधिकारी / कर्मचारी पुरस्काराचे या समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वितरण केले जाणार आहे. याच बरोबर शासकीय योजनांच्या विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण केले जाईल. 

2 ऑगस्ट शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम होणार आहे. 

3 ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे, 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप, 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे, 7 ऑगस्ट रोजी M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.         

महसूल विभाग हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वपूर्ण विभाग आहे. या विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता यावा, जागरूकता वाढावी, शासनाबद्दलचा नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम या सप्ताहादरम्यान राबविण्यात येणार आहेत. विविध प्रलंबित विषय निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *