नागपूर समाचार : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हा परिषद नागपूरला २०२५ सालासाठी ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. सदर अभियान जिल्हयात राबविवण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत १५ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये एकाच दिवशी २ लक्ष ५०७६ वृक्षांची नियोजनबध्द व यशस्वी लागवड करण्यात आली.
ही भव्य वृक्ष लागवड मोहिम नरेगा आणि विविध योजनांच्या सहाय्याने राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी विभागनिहाय स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करून प्रत्येक विभागाला वृक्ष लागवड करण्याची जबाबदारी सोपवली होती.
यात ग्राम पंचायत विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, सिंचन विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, कृषी विभाग, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला.
जिल्हाधिकरी डॉ. विपीन ईटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी कामठी तालुक्यातील खसाळा ग्रामपंचायतीमधे वृक्ष लागवड करुन एकाच दिवशी करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीमध्ये उर्त्स्फुत सहभाग घेत ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.
वृक्ष लागवडीसाठी आवश्यक रोपे सामाजिक वनीकरण विभाग, वनविभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. काही प्रमाणात नरेगा अंतर्गतही रोपे खरेदी करण्यात आली. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीसाठी रोपे वितरित करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रत्येक अंगणवाडीत २ शेवग्याची रोपे लावण्यात आली आहे.
या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांना तालुका पर्यवेक्षण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच, ग्रामपंचायतींकरिता स्थानिक पातळीवर देखील पर्यवेक्षण अधिकारी नेमण्यात आले होते.
एका दिवसात सर्वाधिक वृक्ष लागवड करणारा नवा विक्रम नागपूर जिल्हा परिषदेने नोंदविला आहे. हा उपक्रम केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आम्ही पुढेही राबवू. यातून हरित महाराष्ट्राचा संकल्प अधिक बळकट होण्यासाठी मदत होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी व्यक्त केला.
जिल्हयाचे उददीष्ट पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्याने वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांनी सांगीतले. या वृक्षलागवड मोहिमेच एक वैशिष्ट्य म्हणजे कामठी, नागपूर (ग्रामीण) व पारशिवनी येथे मियावाकी पद्धतीने मानवनिर्मित देवराई व घनवन तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात आला, जो पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.