ॲग्रोव्हिजन फार्मर्स मार्केटचे भूमिपूजन
नागपूर समाचार : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, आधुनिक कृषी तंत्रज्ञान त्यांच्यार्यंत पोहोचविण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी 17 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ॲग्रोव्हिजनला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे, त्यांना प्रशिक्षण मिळावे आणि जागतिक दर्जाच्या कृषी विषयक चर्चा घडवून याव्यात यासाठी निर्माण होणारी ॲग्रोव्हिजनची भव्य वास्तू म्हणजे समाजातील गुणवत्तेला प्रोत्साहन आणि खऱ्या अर्थाने कृषी ज्ञान संकुल असणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
वर्धा मार्गावर हॉटेल रेडिसनच्या शेजारी अँग्रोव्हिजन फार्मर्स मार्केटचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बोरटकर, मार्गदर्शन व ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, ऍडव्हान्टेज विदर्भचे सचिव डॉ. विजय शर्मा, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे राजू मिश्रा, बाळासाहेब कुळकर्णी, स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे सचिव प्रशांत बोपर्डीकर, माजी खासदार डॉ. विकास महात्मे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘भविष्यातील हे फार्मर्स मार्केट आणि कम्युनिटी सेंटर फक्त एक इमारत नाही, तर विदर्भाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने उभारलेली भविष्याची पायाभरणी आहे. ही इमारत केवळ भौतिक वास्तू न राहता, शेती, संशोधन, संस्कृती आणि समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरेल. अँग्रोव्हिजन केवळ प्रदर्शनापुरती ही चळवळ मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या समस्यांचे मार्गदर्शन आणि मार्गक्रमण हे मुख्य उद्दिष्ट या संस्थेच्या स्थापनेमागील आहे. लाखो शेतकरी, उद्योजक आणि तज्ज्ञ या उपक्रमात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसार या इमारती मधून होणार आहे.’
उत्तम काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान व स्टार्टअपमध्ये काम करणाऱ्या तरुणांना यातून प्रेरणा मिळेल असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक श्री रवींद्र बोरटकर यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन कुलकर्णी यांनी केले.
सगळी कार्यालये एका छताखाली
खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलोपमेंट, स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, खासदार क्रीडा महोत्सव समिती, आदी संस्थांचे कार्यालय, काम्युनिटी सेंटर या एकाच इमारतीत राहणार आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्याचे मुख्यालय
स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या गडचिरोली, मेळघाटातील कार्याला आता येथून गती मिळणार. या इमारतीतून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण व सेवा पोहोचवली जाईल. ही इमारत नागपूर विभागात एक नवा मानदंड ठरवेल असेही ते म्हणाले.