मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार सर्वांशी संवाद
नागपूर समाचार : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताला 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था येत्या 2028 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर व 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे ध्येय निश्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या शक्तीस्थळानुसार, नैसर्गिक साधन संपतीनुसार, पर्यटनाच्या संधीनुसार विविध उद्योग व्यवसायांना नियोजनबद्ध आकार देण्यासाठी नागपूर येथील आयआयएम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेत दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्राच्या महास्ट्राइड या सुमारे 2232 कोटी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीवर व्यापक चर्चा केली जात आहे. 28 जून रोजी या कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेस मार्गदर्शन करणार आहेत.
महास्ट्राइड प्रकल्प राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यातील जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण व्हावे यादृष्टीने जागतिक बँकेच्या साहाय्याने महास्ट्राइड प्रकल्पाच्या आखणी, अंमलबजावणी व प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया पूर्ण करुन त्याच्या वित्तीय रचनेस मान्यता देण्यासह या प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी व्हावी यादृष्टीनेही या दोन दिवसीय परिषदेत विचारमंथन केले जात आहे.
या प्रकल्पाअंतर्गत निधीसाठी प्रत्येक जिल्ह्याला आपला स्टॅटाजिक प्लॅननुसार निश्चित केलेल्या बाबी साध्य कराव्या लागतील. याचबरोबर जिल्ह्याच्या विकास नियोजनाबाबत अचूक सांख्यिकी, त्याचे संनियंत्रण, जिल्ह्यातील शक्तीस्थळानुसार उद्योगांचे नियोजन आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. आज याबाबत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, लेखा व कोषागार विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मा.मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी यांनी मार्गदर्शन केले. उद्या दिवसभर विविध सत्र असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहे.
महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण हा जागतिक बँक सहाय्यक राज्यात सर्वसमावेशक जिल्हा केंद्रित विकासास चालना देणे व त्यासाठी संस्थात्मक क्षमता बांधणी करणे त्यासाठी सेवा विकास व डेटा इकोसिस्टीम सक्षम करणे ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने नियोजन विभागाअंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन यांनी ही दोन दिवसीय परिषद आयआयएम नागपूर येथे घेतली आहे. या परिषदेस राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सर्व उप आयुक्त नियोजन, जिल्हा नियोजन अधिकारी, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जिल्हा कोषागार अधिकारी व महाव्यवस्थापक केंद्र जिल्हा उद्योग केंद्र हे उपस्थित आहेत.