- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार

नागपुर : कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा : महापौर संदीपजी जोशी

महापौर संदीप जोशी यांचे नागरिकांना आवाहन : व्यापारी संघटना सहभागी होणार

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वयंस्फूर्तीने ठेवलेला बंद. ह्या शहराचे आरोग्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवस का होईना, आपल्या वागण्याने जर या संक्रमणावर ब्रेक लागत असेल तर आपण ते या शहरासाठी करायलाच हवे. शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या आग्रहाखातर नागपूर महानगरपालिकेने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले. जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंशिस्त पाळणे होय. त्यामुळे हे बंद राहील का, ते बंद राहील का, पोलिसांचे दंडे पडतील का, मनपाकडून दंड ठोठावला जाईल का हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण स्वत:हून दोन दिवस घराबाहेर पडणार नाही, असा प्रण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता असेल, काळजी असेल तर जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘जनता कर्फ्यू’ दरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा आणि औषधींचे दुकाने वगळता काहीही सुरू राहणार नाही, याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यायची आहे. अनेक व्यापारी संघटनांनी आपण जनता कर्फ्यू पाळणार असल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

जनता कर्फ्यूदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. त्यांनी आपले प्रवेशपत्र सोबत बाळगावे. कोरोनाशी लढा अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने आणि कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने जनता कर्फ्यू यशस्वी करणे आवश्यक आहे. यासाठी जनप्रतिनिधींनीही जनतेला उद्युक्त करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *